Holidays 2024 : पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या, सलग तीन सुट्ट्यांची ८ वेळा संधी, कर्मचारीवर्गासाठी पर्वणी | पुढारी

Holidays 2024 : पुढील वर्षी २४ सरकारी सुट्ट्या, सलग तीन सुट्ट्यांची ८ वेळा संधी, कर्मचारीवर्गासाठी पर्वणी

मुंबईः पुढारी वृत्तसेवा : पुढील वर्षी २०२४ मध्ये किती आणि कधी सार्वजनिक सुट्टया मिळणार, याची उत्सुकता सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, बैंक कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी अशा सर्वांनाच लागलेली असते. राज्य सरकारने २०२४ या नवीन वर्षासाठी २४ सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर, तर दिवाळी १ व २ नोव्हेंबरला येणार आहे. (Holidays 2024)

राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांनुसार ८ वेळा सलग तीन दिवस सुट्टयांचा लाभ शासकीय कर्मचारी-अधिकारी आणि शनिवार-रविवार सुट्टया असणाऱ्या खासगी कंपमन्यांमधील कर्मचाऱ्यांना होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या २०२४ च्या सार्वजनिक सुट्यांच्या यादीनुसार पुढील वर्षीच्या सरकारी कर्मचाऱ्यांना २४ सार्वजनिक सुट्टया मिळणार आहेत. यात स्थानिक सुट्यांचा समावेश नाही. पुढील वर्षीच्या दोन सार्वजनिक सुट्यांदिवशी रविवार, तर तीन सुट्टयांच्या दिवशी शनिवार आहे, एक-दोन दिवसांच्या रजा टाकून बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखणाऱ्यांसाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर संधी आहे. (Holidays 2024)

सलग तीन दिवस सुट्टींचा ८ वेळा लाभ २६ जानेवारी शुक्रवारी येत असल्याने आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना सलग तीन दिवस सुट्टया मिळू शकतात. १९ फेब्रुवारी सोमवारी शिवजयंतीची सुट्टी आहे. १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी शनिवार-रविवार येत असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी शासकीय कर्मचाऱ्यांना लाभणार आहे. ८ मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीची सुट्टी असून ९ व १० रोजी शनिवार व रविवारच्या सुट्टया असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय अधिकारी- कर्मचारीवर्गाला घेता येणार आहे. याशिवाय २५ मार्च रोजी सोमवारी होळीच्या दुसऱ्या दिवसाची सुट्टी असल्याने २३ मार्च शनिवार व २४ मार्च रविवार अशी जोडून तीन दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. २९ मार्च शुक्रवार रोजी गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असून ३० व ३१ मार्च अनुक्रमे शनिवार-रविवार अशा सुट्टया येत असल्याने सलग तीन दिवस मिळणार आहेत. बकरी ईदनिमित्त १७ जून रोजी सोमवारी सुट्टी येत असल्याने १५ ते १७ अशा सलग तीन दिवस सुद्धा मिळणार आहेत.

ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने १४ ते १६ सप्टेंबर असा सलग तीन दिवस सुट्टयांचा लाभ नोकरदारांना मिळणार आहे, गुरुनानक जयंती १५ नोव्हेंबर शुक्रवारी असल्याने १५ ते १७ नोव्हेंबर असे सलग तीन दिवस सुट्टया असणार आहेत.

Holiday 2024

रजा टाकून लाँग वीकेंडची संधी, असे करा सुट्ट्यांचे नियोजन

२६ ते २८ मार्च अशा तीन दिवसांची रजा घेतल्यास २३ ते ३१ मार्च असा लाँग वीकेंडचा आनंद घेण्याची संधी नोकरदारवर्गाला लाभणार आहे. एप्रिल महिन्यात सर्वाधिक पाच शासकीय सुट्टया आहेत. ९ एप्रिल मंगळवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे. ६ व ७ एप्रिलच्या शनिवार-रविवारच्या सुट्टीस जोडून ८ एप्रिल सोमवारची रजा घेऊन सलग चार दिवस सुट्टयांचा आनंद घेण्याची संधी आहे.

११ एप्रिल गुरुवारी रमजान ईदची सुट्टी आहे. शुक्रवार १२ एप्रिलची रजा घेऊन १३ व १४ एप्रिल रोजी शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून सलग चार दिवस सुट्टयांचाही आनंद नोकरदारवर्ग घेऊ शकेल, १७ एप्रिल रोजी बुधवारी रामनवमीची सुट्टी असून यापूर्वीच्या दोन दिवस आधी रजा घेऊन १३ ते १७ असा सलग पाच दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेता येईल, तसेच १७ नंतरच्या दोन दिवस रजा घेऊन १७ ते २१ असा सलग पाच दिवसांच्या सुट्टयांचा लाभ घेता येईल.

महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे बुधवारी सुट्टी असून २९ व ३० एप्रिल रोजी रजा घेऊन २७ एप्रिल ते १ मे असा सलग पाच दिवस सुट्टयांचा बोनस लाभू शकतो. बुध्द पौर्णिमेनिमित्त २३ मे गुरुवार सुट्टी असून २४ आणि २५ ची रजा घेऊन २३ ते २६ मे अशा सलग चार दिवसांच्या सुट्ट्या मिळण्याची संधी आहे.

दरवर्षीं पारशी नववर्षानिमित्त मिळणारी सुट्टी यावेळी हा दिवस १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनीच आल्याने स्वतंत्रपणे मिळणार नाही. १५ ऑगस्टनिमित्त गुरुवारी सुट्टी असल्याने शुक्रवारी १६ तारखेची रजा घेऊन १५ ते १८ अशा सलग चार दिवस सुट्टयांचा आनंद घेता येईल.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त बुधवारी २ ऑक्टोबर रोजी शासकीय सुट्टी असून त्यापूर्वीचे दोन दिवस रजा घेऊन २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा सलग पाच दिवस सुट्टयांचा आनंद घेता येईल.

गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर तर दिवाळी १ नोव्हेंबरला

पुढील वर्षी शनिवारी गणेश चतुर्थी ७ सप्टेंबर, तर दसरा १२ ऑक्टोबर हे दोन्ही महत्वाचे सण असणार आहेत. पुढील वर्षी दिवाळीतील लक्ष्मीपूजनाची सुट्टी १ नोव्हेंबर शुक्रवार आणि बलिप्रतिपदानिमित्त २ नोव्हेंबर शनिवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

शनिवार-रविवारी आलेल्या सुट्ट्या

१४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार
२९ एप्रिल महावीर जन्म कल्याणक- रविवार
०७ सप्टेंबर गणेश चतुर्थी- शनिवार
१२ ऑक्टोबर- दसरा- शनिवार
०२ नोव्हेंबर बलिप्रतिपदा शनिवार

हेही वाचा : 

 

Back to top button