

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : सहकार क्षेत्रात ताकदवान बनत असलेल्या राष्ट्रवादीला संपविण्याच्या नादात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचीही वाताहत केली, काँग्रेस चौथ्या क्रमांकावर फेकली गेली, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी टीका केली आहे.
सहकारासंदर्भातील आपण घेतलेल्या काही निर्णयांमुळे राष्ट्रवादीने सरकार पाडले. त्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण देता आले नाही; अन्यथा हा प्रश्न तेव्हाच सुटला असता, असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून चव्हाण यांच्यावर पलटवार करण्यात आला.
तत्कालीन सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शिंदे समिती स्थापन केली होती. शिंदे समितीने अहवाल दिल्यानंतर सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय उच्च न्यायालयात टिकला नाही. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसमुळे ते टिकले नाही, असे चव्हाण यांचे बोलणे आपल्याला विनोदी वाटत आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना आपण ज्येष्ठ आणि अनुभवी नेते मानत होतो. मात्र, ते अलीकडे असे विनोद का करतात हे कळत नाही, असा टोलाही तटकरे यांनी लगावला. दोन पक्षांमध्ये निवडणूकपूर्व आघाडी होत असेल, तर दोन्ही पक्षांच्या विचाराने एकत्र निर्णय घेऊन उमेदवार जाहीर केले जातात. मात्र, काँग्रेसने त्यावेळेला राष्ट्रवादी कोणत्या जागा लढवणार, याची माहिती घेऊन त्या जागांवरील उमेदवार जाहीर केले, जर निवडणूकपूर्व आघाडी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसला बैरी मानून काँग्रेस निर्णय घेत असेल, तर एकत्र काम करण्यात आणि सत्तेला चिकटून राहण्यात अर्थ नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.
तटकरे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊनच पृथ्वीराज चव्हाण कामकाज करत होते. दिल्लीहून महाराष्ट्रात आलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला वैरी मानले होते. त्यामुळे राज्यातील आघाडी सरकारचा कारभार नीट चालला नाही, राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यात त्यांच्याकडून दिरंगाई केली जात होती. अखेरीस राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना भेटून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.