पुढारी ऑनलाईन डेस्क : मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आयोगाकडून भाजपला फ्री हिट आणि आमची मात्र हिट विकेट घेतली जात आहे. निवडणूक आयोग भाजप आणि विरोधकांमध्ये दुजाभाव का करत आहे ? असा सवाल करत निवडणूक आचारसंहिता आणि नियमावलीत आयोगाने बदल केला आहे का ? केला असेल तर आम्हाला तो कळवावा, अशा शब्दांत आयोगावर ताशेरे ओढले. ते मातोश्रीवर आज (दि.१६) आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. (Uddhav Thackeray)
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत गृहमंत्री अमित शहांकडून मतदारांना रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी भाजपकडून मोफत अयोध्यावारी करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे भंग झालेला आहे. परंतु निवडणूक आयोगाकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भाजपवर कोणतीच कारवाई केली जात नाही. याबाबत आयोगाकडून खुलासा करण्याची मागणी ठाकरे यांनी पत्राद्वारे केल्याचे सांगितले. (Uddhav Thackeray)
अनेकदा असे वाटत आहे, भारतीय जनता पक्ष सत्तेवर बसलाय तर त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केले, तर आमची हिट विकेट काढायची. याला काही मोकळ्या वातावरणातल्या निवडणूका म्हणता येत नाही. आचारसंहितेत केलेला बदल केवळ भाजपलाच सांगितला आहे का? अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांनी जर चुकीचे केले नसेल, तर आम्ही जे त्यावेळी केले ते योग्य की अयोग्य होते, ते कळू द्यावे. आता नियमावलीत ढिलाई आणली असेल, तर आम्हीसुद्धा तसा प्रचार करू शकतो की नाही, ते त्यांनी सांगावे, असे ठाकरे म्हणाले.
आमची अमित शहा यांच्याकडे पहिली मागणी अशी आहे, की तुम्ही देशाचे केंद्रीय मंत्री आहात, केवळ मध्य प्रदेश पुरते नाही. तर देशाच्या कानाकोपऱ्यात जे रामलल्लाचे भक्त आहेत. त्यांना त्यांच्या सोयीनुसार मोफत अयोध्यावारी करावी. निवडणुकीच्या आचारसंहितेत, नियमावलीत बदल केले असेल, तर ते आम्हाला कळायला हवेत. ते सर्वांसाठी सारखे हवेत. असे ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांसह शिवसेनेच्या ५ ते ६ आमदारांचा लोकशाहीतील मूलभूत असा मतदानाचा हक्क काढून घेण्यात आला होता. लोकशाहीतला मुलभूत अधिकार हिंदुत्वाचा प्रचार केला म्हणून सहा वर्षांसाठी हिरावून घेतला होता. १९८७ सालच्या पार्ल्यातील निवडणुकीत पहिल्यांदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेने प्रचार केला आणि जिंकली. या निवडणूकीत भाजप आमच्या विरोधात होता,अशी आठवणही ठाकरे यांनी यावेळी सांगितली.
हेही वाचा