Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंब्र्यात फुसके बार आले, पण वाजले नाहीत: एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला | पुढारी

Eknath Shinde vs Uddhav Thackeray : मुंब्र्यात फुसके बार आले, पण वाजले नाहीत: एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला

ठाणे: पुढारी वृत्तसेवा: शिवसेना शाखेवरून मुंब्र्यात घडलेल्या राजकीय नाट्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. मुंब्र्यात फुसके बार आले पण वाजलेच नाही, उलट आमच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि त्यांना युटर्न घेऊन जावे लागले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावला. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांचा जनताच माज उतरवले आणि ग्रामपंयातीच्या निवडणुकीत जनतेने ते दाखवून दिले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

मुंब्र्यातील शिवसेना शाखेच्या ठिकाणची पाहणी करण्यासाठी शनिवारी उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मुंब्र्यात दाखल झाले. त्यांना विरोध करण्यासाठी शिंदे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील दाखल झाल्याने राजकीय तणाव निर्माण झाला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. ठाकरे यांच्या टीकेला मुख्यामंत्री एकनाथ शिंदे यांनीही दिले आहे. (Eknath Shinde vs Uddhav Thackeray)

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, फुसके बार मुंब्र्यात येऊन गेले. मात्र ते वाजलेच नाहीत. आमच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडले आणि त्यांना युटर्न घेऊन जावे लागले, असा टोला त्यांनी यावेळी लगावला. आम्ही शिस्तीने तिथे होतो, अर्धी मुबंई ते येताना सोबत घेऊन आले, दिवाळीमध्ये असे विघ्न आणणे योग्य नाही. सत्तेत असताना कायम सण उत्सवावर बंदी आणली. मात्र, आम्ही ती बंदी उठवली. त्यामुळे काहींना ती पोटदुखी आहे.

माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांचा जनताच माज उतरवले. असे सांगत ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कोण कुठे आहे ते आम्ही दाखवून दिल आहे, ते ७ नंबर वर गेलेत पुढच्या निवडणुकीत ते दस नंबरी असतील,असा टोलाही त्यांनी लगावला. तर जितेंद्र आव्हाडांबाबत प्रतिक्रिया देण्याचे टाळत कोण जितेंद्र आव्हाड अशी खिल्ली देखील त्यांनी उडवली. मुंब्र्यात शिवसेनेची शाखा आम्ही पुन्हा बांधत आहोत, त्याच काम देखील सुरु केले आहे, जनता आमच्या सोबत आहे, जुन्या शाखेत काही व्यवसाय चालत होते. शाखा हे न्याय मंदिर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

दिवाळी पहाट कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचा हिंदुत्वाचा जागर…

ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमात हजेरी लावून मुख्यमंत्री शिंदे यांनी या ठिकाणी हिंदुत्वाचा जागर केला. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, बाळासाहेबांचे विचार मानणारी शिवसेना आहे. सण उत्सव हे मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे, ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांची इच्छा होती. ठाण्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव दिघे साहेबांच्या माध्यमातून सुरु झाले आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले. आपले सरकार आल्यानंतर सणांवावरील सर्व निर्बंध हटवण्यात आले.

Eknath Shinde vs Uddhav Thackeray कार्यक्रमानंतर घेतला मिसळ पावचा आस्वाद …

शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक तथा प्रवक्ते नरेश म्हस्के आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा 

Back to top button