नवी मुंबई : दिवाळीत लक्ष्मीपूजनानंतर सोन्याच्या विक्रीत वाढ झाली. शेवटच्या दोन दिवसात दिवाळी पाडवा आणि भाऊबीजेदिवशी सोने प्रती तोळ्यामागे १५०० रुपयांनी महागले. भाऊबीजेच्या दिवशी एक तोळे सोन्यासाठी जीएसटीसह ६४ हजार ३७५ रुपये ग्राहकांना मोजावे लागले.
मुंबईत या दोन दिवसात ५०० कोटींची उलाढाल झाली, अशी माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली. सोन्याची तेजी एवढ्यावर थांबणार नसून तुळशीविवाहानंतर सुरु होणाऱ्या लग्नसराईपर्यंत सोने ७४ हजार रुपये तोळ्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत ३० टक्क्यानी सोने विक्रीत वाढ झाली. दिवाळीच्या सुरुवातीला मुंबईत ५०० टन तर राज्यात ७०० टन सोन्याची विक्री झाली होती. बलिप्रतिपदा आणि भाऊबीजेला सोने खरेदीला तेजी असण्याची शक्यता कुमार जैन यांनी व्यक्त केली होती. या दोन दिवसांत मुंबईकरांनी ५०० कोटींचे सोने खरेदी केले. विशेष म्हणजे सोने तोळ्यामागे दोन दिवसांत १५०० रुपयांनी महाग झाल्यानंतरही सोने बाजारात तेजी कायम होती. ही तेजी आता लग्नसराई संपेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. दररोज सोन्याच्या दरात वाढ अपेक्षित असून सोने ७४ हजार रुपये तोळ्यापर्यंत जाण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. बलिप्रतिपदेच्या दिवशी सोन्याचा दर ६१ हजार रुपये तोळे अधिक तीन टक्के जीएसटी १८३० मिळून एक तोळे सोने खरेदीसाठी ६२ हजार ८३० रुपये मोजावे लागले. तर दुसऱ्या दिवशी भाऊबीजेला एक तोळे सोने खरेदीसाठी ६२ हजार ५०० रुपये अधिक जीएसटी धरुन ६४ हजार ३७५ रुपये मोजावे लागले.
अजून भाऊबीजेपर्यंत ५० टन विक्रीत वाढ होऊन हा आकडा ५५० टनापर्यंत जाणार असून ३३९ कोटी ९० हजार रुपयांची होईल. तर राज्यातील उलाढाल ही ४६३ कोटी ५० हजार रुपयांची होण्याची शक्यता असल्याची माहिती इंडिया बुलियन ॲण्ड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि झवेरी बाजार संघटनेचे पदधिकारी कुमार जैन यांनी पुढारीशी बोलताना दिली.