Bandra – Worli Sea Link accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, सहा जखमी | पुढारी

Bandra - Worli Sea Link accident : वांद्रे-वरळी सी-लिंकवरील अपघातात तिघांचा मृत्यू, सहा जखमी

मुंबई : पुढारी वृत्तसेवा – मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवर (सी लिंक) गुरुवारी रात्री घडलेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. (Bandra – Worli Sea Link accident ) तर अन्य सहा जण गंभीर जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. (Bandra – Worli Sea Link accident )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वरळी येथून एक इनोव्हा कार भरधाव वेगाने वांद्रेच्या दिशेने जात होती. सी-लिंकच्या वांद्रे दिशेकडील भागात असलेल्या टोल नाक्याच्या १०० मीटर आधी या कारची पुढे चाललेल्या मर्सिडीज कारला धडक बसली. त्यानंतर इनोव्हा कार चालकाने गाडीचा वेग आणखी वाढवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र टोल नाक्यावर गाड्या उभ्या असल्याने कारची या गाड्यांना धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की एका गाडीचा चक्काचुर झाला.

इनोव्हा कारने धडक दिल्याने चार वाहने एकमेकांवर धडकली होती. यात इनोव्हा कारच्या चालकासह एकूण सहा जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर सी-लिंकवर मोठी वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहने हटवून जखमींना तात्काळ उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र यातील दोन महिला आणि एका पुरुषाला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

वांद्रे-वरळी सीलिंक टोल प्लाझा अपघातात एकूण सहा वाहने धडकली आहेत. या अपघातात एकूण नऊ जण जखमी झाले होते. यातील तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असून एकाला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, अन्य पाच जखमींवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास सुरू असल्याचे परीमंडळ नऊचे उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितले.

Back to top button