

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा विषय व्यवस्थित हाताळत असताना छगन भूजबळ यांनी संभ्रम निर्माण करणारे केलेले वक्तव्य अयोग्य आहे. याबाबतची आमची भूमिका मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या समोर मांडणार आहे. प्रसारमाध्यमांसमोर भडक वक्तव्य करणं ही भूजबळ यांची जुनी सवय आहे. पण आताची परिस्थिती मुख्यमंत्र्यांकडून व्यवस्थित हाताळली जात आहे. भडक वक्तव्य करून परिस्थिती खराब करण्याचा प्रयत्न भूजबळांनी करू नये, असे सांगून मंत्री शंभूराज देसाई यांनी छगन भूजबळांचे कान टोचले.
आज पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, उद्या मंत्रीमंडळाची बैठक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची वेळ मागून म्हणणे मांडळार आहे. भूजबळ यांनी अशी वक्तव्य करू नयेत यासाठी त्यांचे नेते अजित पवार यांनी वेळीच लक्ष घालून, अशी वक्तव्य होणार नाहीत यासाठी अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. जरांगे पाटलांना भेटण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीना सरकारनेच विनंती केली होती. सरकारच्याच विनंतीनुसार न्यायमूर्ती जातात आणि सरकारमधीलच एक मंत्री त्यांच्या जाण्यावर आक्षेप घेतात हे बरोबर नाही. ओबीसी समाजाने गैरसमज निर्माण करून घेवू नये. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भूजबळ यांनी अशा पद्धतीची वक्तव्य करून महाराष्ट्रातील जाती जातीमध्ये संभ्रम निर्माण करू नये, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
मराठा समाजातील नेत्यांवर आणि त्यांच्या कुटुंबावर देखील हल्ले झाले, जाळपोळ झाली, पण कुणीही अकाव तांडव केले नाहीत. आम्ही समजून घेतलं. ओबीसी नेत्यांवर हल्ले झाले तर पोलीस नि:पक्षपातीपणे तपास करतील. जरांगे पाटील यांनीही सांगितलं आहे की, हल्ला करणारे मराठे बांधव नाहीत. ते सुरूवातीपासून राज्यातील मराठा बांधवांना शांततेत आंदोलन करण्याच सांगत आहेत. तरीही भूजबळ यांचे म्हणणे असेल की, ओबीसी नेत्यांना टार्गेट करून हल्ले केले जातात, तर ते राज्यातील जबाबदार मंत्री आहेत. त्यांनी गृहमंत्र्यांची भेट घ्यावी, त्यांच्याकडील माहिती द्यावी, संशय कोणावर असेल तर सांगावे, गृहमंत्री कोणी दोषी आढळले तर कारवाई करतील, असेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :