

मुंबई ; चेतन ननावरे : राज्यात निरा लागवडीसह उत्पादन आणि विक्रीस चालना मिळावी म्हणून राज्य शासनाने सुधारित धोरण जाहीर केले आहे. या सुधारित धोरणामध्ये निरा उत्पादन केंद्राच्या 15 कि.मी परिसरात निराविक्रीच्या निर्बंधातून उत्पादकांना सूट दिली आहे. त्यामुळे निरा उत्पादकांना उत्पादन केंद्रापासून कितीही दूर आणि राज्यात कुठेही निरा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्यात निरा देणारी झाडे धेदणे आणि त्यापासून गुळ किंवा अन्य पदार्थ तयार करण्याचे काम चालते. निरा विक्री करताना शासनाचा परवाना आवश्यक ठरतो.
याआधी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने शिफारस केलेल्या सहकारी संस्थांनाच निराविक्रीची परवानगी दिली जात होती. याउलट काही संस्था व निरा उत्पादक शेतकर्यांना प्रायोगिक तत्त्वावर संबंधित महसूल विभागाच्या कार्यक्षेत्रात त्यांनी उत्पादित केलेली निरा सीलबंद करून विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
त्यानंतर शासन धोरण ठरवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केलेली होती. या समितीने निरा देणार्या झाडांची लागवड, निरा सीलबंद करून विकणे, शीतगृहात ठेवणे, निरा उत्पादन आणि विक्री यंत्रणा सक्षम करण्यासाठी अहवाल सादर केला.या अहवालातील शिफारशीनुसार सुधारीत धोरण राबवण्यासाठी शासन निर्णय जारी झाला आहे.
नव्या शासन निर्णयानुसार, निरा व्यवसायासाठी देण्यात येणारा परवाना दर 5 वर्षांनी नूतनीकरण करावा लागेल. वैयक्तिकरित्या किंवा सहकारी संस्थांना हा परवाना मिळेल. दरम्यान मंजूरी देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संबंधित अधिक्षकांनी परिसरातील निरा देणार्या झाडांची उपलब्धता विचारात घ्यायची आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे निरा सीलबंद करण्यासाठी व विक्रीसाठी नमुना एन-3 / एन-4 अनुज्ञप्ती मिळण्यासाठी आता खादी व ग्रामोद्योग महामंडळाच्या शिफारशीची आवश्यकता राहणार नाही. तसेच पामगुळ बनवणे व इतर पाम उत्पादने उद्योग व्हिनेगार इत्यादींसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची परवानगी घेताना खादी व ग्रामोद्योग महामंडळास पूर्वकल्पना देणे बंधनकारक राहील.
* निरापासून गूळ तयार करायचे ठिकाण हे निरा देणार्या झाडांपासून अवघ्या अर्धा मैल अर्थात 800 मीटर पर्यंत असणे बंधनकारक होते. आता ही अट रद्द केली
* निरा काढल्यापासून 24 तासांच्या आत त्याचा वापर करावा लागतो. परिणामी, त्यावर प्रक्रिया करून ती 4 डिग्री किंवा त्यापेक्षा कमी सेल्सीयस तापमानात सीलबंद करून अधिक काळ विक्रीसाठी उपलब्ध होईल. नव्या निर्णयानुसार या कामासाठी उत्पादकांना वेगळ्या परवानगी घेण्याची गरज नाही.
* निरा उत्पादनानंतर किण्वन प्रक्रिया होऊन ताडीमध्ये परिवर्तन होणार नाही याची, दक्षता घेण्यात यावी. तसे झाल्यास कारवाई केली जाईल.
* निरा उत्पादनानंतर, सीलबंद करताना आणि विक्री करताना अन्न सुरक्षा आणि मानके, तसेच सीलबंद निरेची विक्री करताना वैधमापन शास्त्र विभागाच्या तरतुदींचे पालन करणे बंधनकारक राहील.
* सीलबंद स्वरुपात निरेची विक्री राज्यात कुठेही करता येईल. निरा उत्पादनाचे ठिकाण व विक्री केंद्र यामध्ये 10 मैल अर्थात 15 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर नसावे, ही अट रद्द केली आहे.
* निरा विक्रीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधीक्षकांकडून एन-3 / एन-4 ही अनुज्ञप्ती घ्यावी लागेल.