पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने आज (दि.०१) मुंबईत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार आणि आमदारांना निमंत्रित करण्यात आलेले नाही, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर आज सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलावली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना या बैठकीला बोलावण्यात आले आहे. मात्र इतर कोणालाही निमंत्रण देण्यात आलेले नाही. यावरून संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
खासदार संजय राऊत यांनी ट्विट मध्ये लिहिले की, "महाराष्ट्र पेटलाय तरी यांचे निर्ल्लज्ज राजकरण सुरूच आहे. मराठा आरक्षणावर सर्व पक्षीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली. त्या बैठकीचे निमंत्रण शिवसेनेला नाही. शिवसेनेचे १६ आमदार व ६ खासदार आहेत. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. एक आमदार असलेल्यांना आमंत्रण, एकही आमदार नाही अशांना देखील बोलावले, पण शिवसेना यांच्या डोळ्यात खुपते. अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावले ठीक; आम्हाला मानपान नको, पण प्रश्न सोडवा. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवा. घटनाबाह्य सरकारची घटका भरलीच आहे. हिशोबाची वेळ जवळ येत आहे," असे त्यांनी म्हटले आहे.