

मुंबई : सोसायटीला म्हाडाकडून मिळालेला प्लॉटच्या पुनर्विकासाची आमीष दाखवून एका वयोवृद्ध बांधकाम व्यावसायिकाची 67 लाखांची फसवणूक झाल्याचा प्रकार कांदिवली परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सोसायटीचे मुख्य प्रवर्तक विनोदचंद्र हरखलाल गांधी आणि मनुभाई पटेल ऊर्फ सोडी या दोघांविरुद्ध चारकोप पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या पसवणूक प्रकरणातील तक्रारदार बांधकाम व्यावसायिक असून बोरिवली परिसरात राहतात. त्यांची एक बांधकाम कंपनी असून त्यात त्यांच्यासह त्यांची दोन मुले संचालक आहेत. आरोपी मनुभाई इस्टेट एजंट असून गेल्या 25 वर्षांपासून त्यांच्या परिचित आहे. त्याने विनोदचंद्र याची ओळख जानेवारी 2018 रोजी तक्रारदाराशी करून दिली होती. त्याने कांदिवलीतील एका सोसायटीचा मुख्य प्रवर्तक असल्याचे सांगून त्यांच्या सोसायटीला म्हाडाकडून एक प्लॉट अलोट झाला आहे.
या प्लॉटचा पुनर्विकास करायचा आहे असे सांगून कामाची ऑफर दिली. त्यानुसार तक्रारदाराच्या कंपनीला 80 तर त्यांच्या सोसायटीला 20 टक्के हिस्सा देण्याचे ठरले होते. हा प्रपोजर चांगला वाटल्याने त्यांनी त्यांच्यासोबत प्लॉटच्या पुनर्विकास करण्याबाबत एक करार केला होता. याच कामासाठी त्यांनी त्यांना 22 लाख कॅश तर 67 लाख चेकद्वारे दिले होते. याच दरम्यान या प्लॉटवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती.
जानेवारी 2025 रोजी त्यांच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिला होता, मात्र पुनर्विकासाचे काम सुरू होण्यापूर्वी विनोदचंद्रने त्यांच्यासोबत करार रद्द केला. मात्र घेतलेली रक्कम परत केली नाही. या रक्कमेचा परस्पर अपहार करुन त्यांनी त्यांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी चारकोप पोलिसांत तक्रार केली आहे.