

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक प्रवासात महत्वाचे स्थान आणि मुंबईकरांची पहिली पसंती असणार्या बेस्टच्या डबलडेकर बसला निरोप दिल्यानंतर आता सोमवारपासून प्रीमियर पद्मिनी टॅक्सीही रस्त्यावरुन गायब होणार आहे. या वर्षात आधुनिक एसी इलेक्ट्रिक डबलडेकर आणि अॅप आधारित कॅब तसेच नविन मॉडेलच्या टॅक्सी मुंबईकरांच्या सेवेत आल्या असल्या तरी वाहतुकीच्या या दोन साधनांची आठवण मुंबईकरांच्या मनात कायमच राहणार आहे.
गेल्या सहा दशकांपासून मुंबईच्या रस्त्यांवर धावणारी प्रीमियर पद्मिनी टॅक्सी ही शहराची ओळख आहे. या टॅक्सीला काली-पिली म्हणूनही ओळखले जाते. मात्र आता सहा दशकांनी या टॅक्सीची चाके थांबणार आहेत. नवे मॉडेल आणि अॅप आधारित कॅब सेवांनंतर ही प्रीमियम टॅक्सी आता मुंबईच्या रस्त्यावरून नाहीशी होणार आहे.
ताडदेव आरटीओमध्ये प्रीमियर पद्मिनीची 29 ऑक्टोबर 2003 ला शेवटची नोंदणी झाली होती. तिचा नंबर चक-01-ग–2556 आहे. शहरात टॅक्सी चालवण्यासाठीची कालमर्यादा 20 वर्षे आहे. त्यामुळे सोमवारपासून मुंबईत अधिकृतपणे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी चालवता येणार नाही. शेवटची नोंदणी केलेल्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सीचे मालक अब्दुल करीब कारसेकर यांनी सांगितले की, मुंबईची ही शान आणि आमची जान आहे. मुंबईत सध्याच्या घडीला विविध मॉडेलच्या सुमारे 32 हजार टॅक्सी धावतात.
प्रीमियर पद्मिनीचा प्रवास
प्रीमियर पद्मिनीचा प्रवास 1964 मध्ये 'फियाट-1100 डिलाइट' मॉडेलने सुरू झाला. ही गाडी 1200-सीसी स्टीयरिंग-माउंटेड गियर शिफ्टर असलेली शक्तिशाली होती. प्लायमाउथ, लँडमास्टर, डॉज आणि फियाट 1100 सारख्या मोठ्या टॅक्सी पेक्षा लहान होती.त्यामुळे तिला 'डक्कर फियाट' म्हणून ओळखले जायचे. 1970 च्या दशकात प्रसिद्ध भारतीय राणी पद्मिनी नंतर मॉडेलला प्रीमियर प्रेसिडेंट आणि नंतर प्रीमियर पद्मिनी म्हणून पुन्हा ब्रँड केले. त्यानंतर, प्रीमियर ऑटोमोबाईल लिमिटेडने उत्पादित केलेल्या गाडीचे नाव 2001 मध्ये त्याचे उत्पादन बंद होईपर्यंत कधीही बदलले नाही.
सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे उत्पादन बंद झाल्यामुळे सुमारे 100 ते 125 प्रीमियर पद्मिनी टॅक्सी नोंदणीकृत होऊ शकल्या नाहीत. 60 च्या दशकात मुंबई आणि कोलकातामध्ये दर दुसर्या महिन्याला 25 ते 30 ऋळरीं -1100ऊ किंवा अॅम्बेसेडर कार टॅक्सी म्हणून मिळत होत्या. सरकारने दोन शहरांसाठी कोटा निश्चित केला होता, परंतु मुंबईतील टॅक्सीचालकांना अॅम्बेसेडर कार खरेदी करण्यात रस नव्हता तर कोलकातामधील फियाटचीही अशीच परिस्थिती होती. म्हणून, मुंबईतील टॅक्सी युनियनने कोलकातासोबत गाड्यांची देवाणघेवाण केली. त्यामुळे मुंबईला फक्त फियाट टॅक्सी मिळाल्याची माहिती मुंबई टॅक्सीमेन यूनियनचे महासचिव ए. एल. क्वाड्रोस यांनी दिली.
मुंबईतील प्रवासाचा अविभाज्य घटक राहिलेल्या प्रीमियर पद्मिनी टॅक्सी सोबत अनेकांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी पुढच्या पिढीला दाखविण्यासाठी राज्य सरकार ,आरटीओने किमान एक प्रीमियर पद्मिनी टॅक्सी रस्त्यावर किंवा संग्रहालयात जतन करण्याची मागणी केली आहे.
याचिका फेटाळली
काही वर्षांपूर्वी मुंबई टॅक्सीमॅन युनियनने किमान एका प्रीमियर पद्मिनी टॅक्सीला संरक्षित करावे यासाठी याचिका दाखल केली होती. मात्र ही याचिका फेटाळून लावण्यात आली. त्यामुळे प्रीमियर पद्मिनी टॅक्सी आता फक्त जुन्या चित्रपटांमध्ये आणि काही पोस्टर्समध्येच बघायला मिळणार आहे.