हिर्‍यांची राजधानी मुंबईतून सुरतला; १ हजार व्यापारी कार्यालये बंद करून सुरतच्या मार्गावर | पुढारी

हिर्‍यांची राजधानी मुंबईतून सुरतला; १ हजार व्यापारी कार्यालये बंद करून सुरतच्या मार्गावर

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र गुजरातला गमावल्यानंतर आता मुंबईला आणखी एक मोठा धक्का बसणार असून, देशातील सर्वांत मोठे हिरे व्यापारी केंद्र म्हणून मुंबईने पटकावलेला मान आता सुरतकडे जाऊ शकतो. तब्बल 3400 कोटी रुपये गुंतवून उभारलेल्या सुरत डायमंड बोर्सने असंख्य सवलती दिल्याने मुंबईच्या हिरे व्यापार्‍यांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. आघाडीचे हिरे व्यापारी वल्लभभाई लखानी यांनी त्यांचा 17 हजार कोटी रुपयांचा हिरे व्यापार मुंबई सोडून सुरतला हलवला आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आणखी एक हजार हिरे व्यापारी मुंबईतील कार्यालये बंद करून सुरतची वाट धरू शकतात.

या स्थलांतरामुळे देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या राजमुकुटातील हिराच काढून घेतला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. गेले काही दिवस मुंबईचा हिरे व्यापार सूरतला हलवला जाणार असल्याचे आरोप विरोधी पक्षांनी केले. अर्थात त्यांच्याकडे या स्थलांतराचा तपशील नव्हता. मात्र, पुढारीने सूरत डायमंड असोसिएशन आणि मुंबईच्या बीकेसीतील भारत डायमंड बोर्स आणि मुंबईतील हिरे व्यापाराचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या पंचरत्नमधील व्यापार्‍यांशी चर्चा केल्यानंतर धक्कादायक तपशील हाती आला.

सूरतला डायमंड सिटी म्हटले जाते. सूरतमधील कारखान्यांमध्ये बनवलेले हिरे देशातील आणि जगातील विविध देशांमध्ये निर्यात केले जातात. या हिर्‍यांचा व्यवसाय लाखो लोकांना रोजगार देतो. सूरतमध्ये तयार करण्यात आलेले हिरे जगातील विविध देशांमध्ये पाठवले जातात ते मुंबईतून. मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे सूरतच्या हिरे व्यापार्‍यांना मुंबईत स्वतंत्र कार्यालय सुरू करावे लागले. यातून मुंबईत देशातील सर्वांत मोठा हिरे व्यापार आकारास आला. बीकेसीत दोन लाख चौरस फूट परिसरात उभारण्यात आलेले भारत डायमंड बोर्स हे 2500 कार्यालये असलेले जगातील सर्वांत मोठे हिरे संकूल समजले जाते. याशिवाय दक्षिण मुंबईतील पंचरत्न इमारतीतील उलाढाल वेगळीच. यातून हिरे व्यापाराची राजधानी म्हणून मुंबईची ओळख जगभर पोहोचली. आता मुंबईचे हे स्थान सूरतने ठरवून धोक्यात आणले आणि मुंबईतील हिरे व्यापार्‍यांनी स्थलांतर सुरू केले.

मुंबई विरुद्ध सूरत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सूरतच्या टोलेजंग डायमंड बोर्स संकुलाचे उद्घाटन होणार असून त्याआधीच मुंबईतील हिरे व्यापार्‍यांना सूरतकडे खेचण्यासाठी अनेक सवलती जाहीर करण्यात आल्या. सूरत डायमंड बोर्स 9 टॉवर्सचे असून, प्रत्येकी 15 मजले आहेत. 67 लाख चौरस फूट परिसरात उभारलेल्या या संकुलात 4500 हिरे कंपन्यांची कार्यालये आहेत. मुंबईतील हिरे व्यापार हलवल्याशिवाय सूरतचा हिरे व्यापार नंबर एक होणार नाही. याची जाणीव असल्यामुळेच सूरत डायमंड बोर्सने अनेक सवलती जाहीर केल्या आणि तिथेच सूरत विरुद्ध मुंबई संघर्षाची ठिणगी पडली. सुरत डायमंड बोर्सच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी सांगितले की, आतापर्यंत जगातील विविध देशांमध्ये हिरे पाठवण्यासाठी सूरतच्या व्यावसायिकांना मुंबईत स्वतंत्र कार्यालयीन कर्मचारी ठेवावे लागत होते, कार्यालय उघडावे लागत होते आणि आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे त्यांना मुंबईतूनच व्यवसाय करावा लागत होता. पण आता सूरत डायमंड बोर्समध्ये हिरे व्यापार्‍याला आवश्यक असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. जगातील सर्वात मोठे कस्टम हाऊस तयार आहे. आता सूरत विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणेही सुरू होणार असून, त्यामुळे सूरतचे हिरे व्यापारी आता मुंबईऐवजी सूरतमधून जगभरातील हिर्‍यांचा व्यवसाय करू शकतील, असे नावडिया म्हणाले.

स्थलांतर सुरू झाले

आता मुंबईतून जगभरात हिर्‍यांचा व्यवसाय करणारे सूरतचे हिरे व्यापारी मुंबईतील व्यवसाय बंद करून सूरतला स्थलांतरित होण्यास सुरुवात झाली आहे. सूरतमध्ये जवळपास 1 लाख लोकांना एकाच छताखाली रोजगारही मिळणार आहे. दिनेश भाईंनी सांगितले की, सूरत डायमंड बाजार उघडल्यानंतर मुंबईतील हिरे व्यवसायाशी संबंधित सुमारे 1000 कार्यालये कायमची बंद होतील. त्यामुळे महाराष्ट्र सरकारचेही कोट्यवधींचे करनुकसान होऊ शकते.

आतापर्यंत मुंबईतून किती हिरे व्यापार्‍यांनी स्थलांतराचा निर्णय घेतला हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र, एक हजार कार्यालये बंद होणार असतील तर तितक्याच संख्येने व्यापारी सूरतला गेलेले असतील हे स्पष्ट आहे. देशभरात आघाडीचे हिरे व्यापारी म्हणून नाव असलेले किरण जेम्सचे अब्जाधीश संचालक वल्लभभाई लखानी यांनी मुंबईला पहिला धक्का दिला. त्यांनी आपला 17 हजार कोटींचा हिरे उद्योग मुंबईतून सूरतला हलवला असून, तेथे आपल्या कर्मचार्‍यांसाठी 1200 फ्लॅट्सचे एक गृहसंकुलच त्यांनी आपल्या 2500 कर्मचार्‍यांसाठी उभारले आहे. वल्लभभाईंचा हिरे उद्योग गेली 30 वर्षे मुंबईतून चालला. यापुढे तो सूरतमधून चालेल. आणखी किती हिरे व्यापारी मुंबई सोडणार हे काही दिवसांत स्पष्ट झालेले असेल.

मुंबई सोडण्यासाठी सुरतच्या सवलती

जो हिरे व्यापारी मुंबईतील कार्यालय पूर्ण बंद करून सुरतला कार्यालय सुरू करेल आणि मुंबई कार्यालयातून पॉलिश केलेल्या हिर्‍यांची विक्री पूर्णत: बंद करून सुरतमधून ती सुरू करेल त्याचे नाव सुरत डायमंड बोर्सच्या स्वागत कक्षात सुवर्णअक्षरांनी कायमचे लावले जाईल, हे पहिले प्रलोभन. याशिवाय सुरत डायमंड बोर्समधील कार्यालयाला किमान तीन वर्षे कोणताही देखभाल खर्च द्यावा लागणार नाही, अशीही सवलत जाहीर करण्यात आली. सुरतमधून मुंबईला गेलेले व्यापारी परत यावेत म्हणून या सवलती देण्यात काहीच गैर नाही, अशी भूमिका सुरत डायमंड बोर्सच्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य दिनेश भाई नावडिया यांनी मांडली.

Back to top button