दोन वर्षांत शिवसेनेची काँग्रेस कशी होईल : उद्धव ठाकरे | पुढारी

दोन वर्षांत शिवसेनेची काँग्रेस कशी होईल : उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  शिवसेनेने हिंदुत्व सोडून काँग्रेसला जवळ घेतले, शिवसेनेची काँग्रेस झाली असे आरोप अनेक बाटगे करतात. पण 25-30 वर्षे भाजपसोबत राहून शिवसेनेची भाजप झाली नाही तर दोन वर्षांत काँग्रेस कशी होईल, असा सवाल करत शिवसेना म्हणजे काय मिंधे गट वाटला काय अशी टीका शिवसेना ( ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी शिंदे गटावर केली.

पिंपरी चिंचवडमधील भाजपचे नेते एकनाथ पवार आणि चेतन पवार यांनी मातोश्री निवासस्थानी आपल्या कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर टीका केली. दसरा मेळाव्यातील भाषणात बोलताना फक्त सतरंज्या उचलण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष वाढविला का, असा प्रश्न केला होता. त्या विधानाची आठवण करुन देत ठाकरे यांनी पिंपरी-चिंचवडमधील राजकारणावरही टोलेबाजी केली. पिंपरी-चिंचवड हे पुण्यात येते. आता तिथे अजित पवार पालकमंत्री आहेत. महाविकास आघाडीचे सरकारच्या काळातही तेच होते. त्यावेळी त्यांच्याविरुध्द भाजपने रान उठवले होते. मोदींनीही त्यांच्यावर 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले. पुण्यात भाजपने चांगली बांधणी केल्याने त्यांचे महापालिकेत 98 उमेदवार निवडून आले होते. आता अजित पवार भाजपसोबत गेल्याने ती बांधणी कुणाच्या हातात दिली? भाजपवाले त्यांना चक्की पिसायला पाठवणार होते मग आता ती बांधणी कोण पिसून टाकणार? यासाठी तुम्ही मेहनत केली होती का? असे प्रश्नही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.

एकनाथ पवार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षाच्या संघटकपदी नियुक्ती केली. त्यासंदर्भातील घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली. त्याचप्रमाणे भाजपा युवा मोर्चाच्या कामाचा अनुभव असलेले चेतन पवार यांच्यावर युवा सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Back to top button