जरांगे-पाटील यांच्यावरील टीकाप्रकरणी रामदास कदमांचे घुमजाव

जरांगे-पाटील यांच्यावरील टीकाप्रकरणी रामदास कदमांचे घुमजाव
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आम्ही मराठा आहोत, कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही, असे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार्‍या मनोज- जरांगे यांना ठणकावणार्‍या रामदास कदम यांनी आझाद मैदानातील आपल्या भाषणातून घुमजाव केले. कोकणातील परिस्थिती वेगळी असल्यामुळे आपण ही भूमिका घेतल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

रामदास कदम म्हणाले की, जरांगे आम्ही तुमच्याविरोधात नाही. मराठा आरक्षण मिळावे, ही आमचीही भूमिका आहे. सरकारच्या छाताडावर बसा. तज्ञाचे मत घ्या; पण मराठ्यांना टिकावू आरक्षण मिळवून द्या.कारण ओबीसीमधून आरक्षण घेतल्यास ते बांधव विरोध करतील. त्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी शक्यता कदम यांनी व्यक्त केली.मराठा मोर्चाला मुका मोर्चा संबोधून महिलांचे मुके घेतानाचे छायाचित्र शिवसेनेच्या मुखपत्रात प्रकाशित करणार्‍या राऊत यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दात त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या विविध विकास योजनांची माहिती दिली. महात्मा फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना, 1 रुपयात पीक विमा योजना, कांदा शेतकर्‍यांना नुकसान भरपाई, आनंदाचा शिधा, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत इत्यादी निर्णय घेतले असताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे सरकार शेतकर्‍यांसाठी काहीही करत नसल्याचा आरोप करत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकर्‍यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेपर्यंत पोहचवा, असे आवाहन मंत्री पाटील यांनी केले.

शिवसेनेच्या सोलापूरमधील पदाधिकारी ज्योती वाघमारे यांनीही संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री शिंदे यांच्याविरोधात वायफळ बडबड करणारे राऊत यांना वेड्याच्या रुग्णालयात न्यावे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि हिंदूंच्या दैवतावर टीका करणार्‍या सुषमा अंधारे या तुमच्या शिवसेनेच्या चेहरा आहेत का, असा सवालही त्‍यांनी ठाकरे गटाला विचारला.

खुर्चीसाठी लाचार झालेल्या आणि इमान विकलेल्या लोकांचा शिवाजी पार्कमध्ये मेळावा भरला आहे. आझाद मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा मेळावा भरला आहे. बाप चोरला म्हणणारे आणि स्वतःला मर्द म्हणणारे उद्धव ठाकरे कधीही लोकांसाठी मैदानात उतरले नाहीत; पण कोरोना काळात थेट रुग्णालयात रुग्णांची भेट घेणारा आणि रायगड जिल्ह्यातील इरसालवाडीत मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी भर पावसात डोंगर चढून जाणारे मुख्यमंत्री शिंदे हेच खरे मर्द आहेत, असा टोला वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news