ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापले | पुढारी

ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या गौप्यस्फोटानंतर राजकारण तापले

मुंबई/नाशिक; पुढारी वृत्तसेवा :  ड्रग्ज माफिया ललित पाटील याने मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला पळवले गेले. यामध्ये कुणाकुणाचा हात आहे, ते सगळे सांगणार आहे, असे सांगितल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातील सर्व लागेबांधे उघड करणार असल्याचा इशारा दिला आहे; तर विरोधकांनी नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्यासह सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठवली आहे.

…तर राजकारण सोडेन : भुसे

ड्रग्ज प्रकरणात माझ्यावरील सर्व आरोप खोटे, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. अशा आरोपांना भीक घालत नाही. नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा, मी त्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे, असे स्पष्ट करत ड्रग्ज किंवा कुठल्याही प्रकरणात संबंध आलाच तर पदासह राजकारण सोडेन, असा निर्वाणीचा इशारा पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे यांनी दिला आहे.

तरुणांना बरबाद करण्याचे सरकारचे पाप : पटोले

तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढून त्यांना बरबाद करण्याचे पाप भाजप सरकार करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. पटोले म्हणाले, महाराष्ट्रात ड्रग्जचे साठे सापडणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी घटना आहे, या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण? त्याचा शोध लागला पाहिजे.

लागेबांधे उघड करणार : फडणवीस

पुणे : ललित पाटीलसंदर्भात मला संबंधित यंत्रणेकडून सविस्तर माहिती मिळालेली आहे. याची आणखी माहिती घेत आहे. या प्रकरणातील सर्व लागेबांधे लवकरच उघड करू, असा इशारा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले.

जागांबाबत आताच सांगू शकत नाही

शिंदे गटाला लोकसभेसाठी 22 जागा देणार का, असा प्रश्न विचारला असता, त्यांनी याला नकार दिला. ते पुढे म्हणाले, ज्याला जितक्या जागा द्यायच्या आहेत, तितक्या जागा आम्ही देऊ, याबाबत आताच काहीही सांगू शकत नाही.

Back to top button