पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्यातील ससून रुग्णालयातून पसार झालेल्या अमली पदार्थ तस्कर ललित पाटील याला मुंबई पोलीसांनी अखेर अटक केली आहे. मुंबई पोलीसांनी ललित पाटीलला चेन्नईमधून अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.
ससून रुग्णालयातून ड्रग माफिया ललित पाटील हा आरोपी दोन आक्टोबरला रात्री रुग्णालय प्रशासनाला चकवा देत पसार झाला होता. या प्रकारानंतर ससून रुग्णालय प्रशासनावर अनेक आरोप प्रत्यारोप केले जात होते .या घटनेने पुण्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. यानंतर पुणे पोलिसांबरोबर मुंबई पोलिस हे देखील त्याच्या मागावर होते. ललित पाटील हा तब्बल सतरादिवस फरार होता.
पोलिसांना अक्षरशः त्याने घाम फोडला होता. जंग-जंग पोलीस त्याला शोधत होते. तरी तो सापडत नव्हता. अखेर ललित पाटील चेन्नईमध्ये असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणेनेदेखील सुटकेचा निश्वास सोडला आहे. आरोपी ललित पाटीलला आज मुंबईला आणण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी ललित पाटील येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयातील वॉड क्रमांक १६ मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र ललित पाटील हा कॅन्टीनमधील दोन कामगारांच्या मदतीने मेफेड्रॉन अमली पदार्थ विक्री करत होता. या प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रुग्णालय परिसरातून दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन कोटी रुपयांचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले होते. या सर्व प्रकारानंतर पाटील याला दोन ऑक्टोबरला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक्स रे काढण्यासाठी नेत असताना पोलिसांना चकवा देत तो फरार झाला. यामध्ये आत्तापर्यंत ४ ड्रग माफियांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा