अडचणीच्या काळात मी त्यांच्या मागे नव्हतो का? शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा | पुढारी

अडचणीच्या काळात मी त्यांच्या मागे नव्हतो का? शरद पवारांचा भुजबळांवर निशाणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे तुरुंगात असताना त्यांना वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी शरद पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. आपण तुरुंगात असताना शरद पवार हे आपल्या पाठिशी उभे राहिले नाहीत, असा आरोप छगन भुजबळांनी केला असताना हे पत्र आता समोर आले आहे. ८ मार्च २०१८ रोजी पवारांनी हे पत्र लिहले होते. या पत्राचा उल्लेख करत शरद पवारांनी अडचणीच्या काळात मी त्यांच्या मागे नव्हतो का ? असा पलटवार भुजबळांवर केला आहे.

भुजबळ तुरुंगात असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना विविध आजारांनी त्रास होत होता. त्यावेळी शरद पवारांनी भुजबळ यांना योग्य उपचार मिळावेत अशी विनंती फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती.

या पत्रात पवारांनी म्हटले होते की, गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ यांची प्रकृती ढासळत असल्याच्या धक्कादायक बातम्या येत आहेत. वयाच्या ७१ व्या वर्षी ते दोन वर्षापासून ते तुरुंगात आहेत. त्यांची प्रकृती नाजूक बनली आहे. आत्तापर्यंत छगन भुजबळ यांच्यासंबंधी कायदेशीर बाबींवर न्यायालयाने निर्णय दिलेला नाही आणि जोपर्यंत न्यायव्यवस्था निष्कर्षापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत ते निर्दोष असल्याचे मानले जाते. जामीन हा नियम आहे आणि तुरुंग हा अपवाद आहे असे सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी सांगितले आहे. हेच तत्व भुजबळ यांनाही लागू आहे. जामीन नाकारला जाणे दुर्दैवी आहे. छगन भुजबळ हे सार्वजनिक जीवनात ५० वर्षांहून अधिक योगदान असलेले आदरणीय ओबीसी नेते आहेत. महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी दिलेले योगदान नाकारता येणार नाही. त्यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत याशिवाय मला काहीही अपेक्षित नाही, हा त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे, असे पवार यांनी म्हटले होते.

… तर सरकार जबाबदार राहील

छगन भुजबळ यांची एकंदरीत आरोग्य स्थिती आणि त्यांचे वाढलेले वय याची पूर्ण माहिती असल्याने, मला खात्री आहे की छगन भुजबळ यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार व्हावेत यासाठी तातडीने पावले उचलली जातील. पुढील काळात छगन भुजबळ यांच्याबाबत काही अप्रिय घटना घडली तर त्यासाठी तुमचे सरकार जबाबदार राहील, असा इशाराही शरद पवारांनी या पत्रातून दिला होता

Back to top button