

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : विरोधी पक्षनेते असताना धनंजय मुंडे यांनी माझ्याबाबतची भूमिका व्यवस्थित बजावली, पण आता आमचा बहीण-भावाचा राजकीय संघर्ष संपुष्टात आला आहे. भविष्यात कोणाला परळीत तिकीट मिळेल हे आता सांगता येणार नाही, असे वक्तव्य भाजप नेत्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
'पुढारी न्यूज चॅनल'वर नवरात्री निमित्त 'सन्मान नवदुर्गां'चा या मालिकेत त्यांची पहिली मुलाखत झाली. राज्यात निर्माण झालेल्या वेगळ्या राजकीय परिस्थितीमुळे मी आणि धनंजय मुंडे यांच्यापैकी कोणाला परळी मिळणार हे माहीत नाही. ही वेळ फार वेगळी आहे. आजपर्यंत प्रमुख नेत्यांवर अशी कुठेही वेळ आली नव्हती, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. राज्य असो की केंद्र, मला ताकदीने राजकारण करता आले पाहिजे. राजकारण कुठे करायचे हा माझ्यासाठी विषय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
संघर्षाचा वारसा मला वडिलांकडूनच मिळालेला आहे. मी जखमी वाघीण वगैरे काही नाही. मला कोणी जखमी करू शकत नाही. राजकारणाच्या पटलावर तरी मी जखमी होणार नाही, असे सांगताना मी सोशिक आहे पण माझा सोशिकपणा माझ्यावर प्रेम करणार्यांना कळत नाही, असेही त्या म्हणाल्या.
मी मुख्यमंत्रिपदाबाबत अजिबात इच्छा व्यक्त केली नव्हती. एका कार्यक्रमांमध्ये समोरच्याने प्रश्न विचारला म्हणून मी बोलले होते. पण मला डॅमेज करण्यासाठी त्याचा वापर केला गेला. पक्षांमध्ये पद देण्याबाबत प्रक्रिया कशा होतात हे सर्वांना ठाऊक आहे, पण मी असे म्हणाले तरी काही आभाळ कोसळले नव्हते. अनेक जण आपल्या उमेदवार्या जाहीर करतात, तेव्हा चर्चा होत नाही. माझ्या विधानाची चुकीची चर्चा झाली, असे त्यांनी स्पष्ट केले.
वडिलांचे जाणे हेच माझ्यासाठी मोठे दुःख आहे, अशी खंत व्यक्त करताना कोणतेही ध्येय गाठताना काटे हे असतातच आणि ज्यांची काटेरी वाट असते तेच दिसून येतात. मी सध्या ब्लॉक वगैरे नाही उलट स्ट्राँग झालेले आहे, असे त्या म्हणाल्या.