मनोज जरांगेंच्या सभेला अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा जनसागर उसळला | पुढारी

मनोज जरांगेंच्या सभेला अंतरवाली सराटीत मराठा बांधवांचा जनसागर उसळला

जालना : पुढारी वृत्‍तसेवा अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची महासभा होत आहे. या सभेला हजारोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झाले. सकल मराठा समाजाच्या तरूणांमध्ये जल्‍लोषाचे वातावरण आहे. काल (शुक्रवार) रात्रीपासूनच महाराष्‍ट्रभरातून मराठा समाजबांधव या सभेच्या ठिकाणी दाखल झाले. सभास्‍थळी ‘एक मराठा, लाख मराठा’ ची घोषणाबाजी करण्यात येत आहे. आरक्षण घेतल्‍याशिवाय जाणार नाही अशा घोषणा मराठा बांधवांकडून देण्यात येत आहेत. महाराष्‍ट्र दौऱ्यानंतर अंतरवालीत जरांगेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे. तब्‍बल २५० एकर मैदानात या सभेचं आयोजन करण्यात आले आहे. मराठा बांधवांसाठी काही ठिकाणी अन्नदानाची व्यवस्‍था करण्यात आली आहे. सभास्‍थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्‍त ठेवण्यात आला आहे.

आरक्षण घेतल्याशिवाय सरकारला सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे. जरांगे सभास्‍थळी दाखल होताच या ठिकाणी जल्‍लोष सुरू झाला. लाखोच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाला त्‍यांनी अभिवादन केले. सकल मराठा समाजाच्या युवक तरुणांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मुख्य स्टेजवर एन्ट्री करताच कोण आला रे कोण आला मराठ्यांचा वाघ आला अशा लक्षवेधी गगनभेदी घोषणा सुरू झाल्‍या. यावेळी प्रचंड टाळ्यांचा कडकडाटासह मनोज जरांगे पाटील यांचे सभास्थळी जल्लोषात स्वागत करण्यात आले.

दरम्‍यान या सभेला येणाऱ्यांच्या वाहनांच्या पार्किंगसाठी तब्‍बल 160 एकर ग्राउंड हाऊसफुल्‍ल झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला जिकडे पाहावे तिकडे गाड्यांचे पार्किंग केल्‍याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुने गाड्यांच्या रांगा लागल्‍या आहेत.

हेही वाचा : 

Back to top button