ड्रग्ज पार्टी प्रकरण : पार्टीआधीच रचला आर्यनला अडकवून वसुलीचा डाव | पुढारी

ड्रग्ज पार्टी प्रकरण : पार्टीआधीच रचला आर्यनला अडकवून वसुलीचा डाव

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कॉडेर्र्लिया क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुख खान यांच्याकडून वसुली करण्याचा डाव एनसीबीचा पंच किरण गोसावी याने आधीच रचल्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून उघड झाले आहे. याबाबत एनसीबीचे विशेष पथक अणि मुंबई पोलिसांचे विशेष पथक स्वतंत्रपणे तपास करत आहे.

कॉर्डेलिया क्रूझवरील पार्टीमध्ये कोण येणार होते, हे पंच किरण गोसावी याला आधीच माहीत होते. त्याच्याकडे 10 जणांची यादी होती. या 10 जणांना अटक करण्यासाठी सापळा रचला गेला. त्याने ही माहिती अंगरक्षक व पंच प्रभाकर साईल याला दिली. शाहरुख खान यांच्याकडून एनसीबीच्या नावाने खंडणी वसुलीचा डाव आधीच ठरला होता. ही सर्व माहिती किरण गोसावी आणि प्रभाकर साईल यांच्या 2 व 3 ऑक्टोबरच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटमधून उघड झाली आहे. साईलने हे पुरावे मुंबई पोलिसांनंतर आता एनसीबीलाही दिले आहेत. गोसावीने 2 ऑक्टोबरला दुपारी 1 वाजून 23 मिनिटांनी पाठवलेले संदेश, छायाचित्रे आणि चॅटनुसार त्याने क्रूझवरील पार्टीला येणार्‍या व्यक्तींची ओळख पटवण्याचे काम साईलला दिले होते.

ड्रग्ज पार्टी वरील एनसीबीच्या छापेमारीनंतर खूप मोठा खेळ रचण्यात आल्याचे गोसावी आणि साईल यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटवरून स्पष्ट होते. गोसावीने साईलला हाजी अलीला जाऊन इंडियाना हॉटेलजवळ कोणाकडून तरी 50 लाख रुपये रोकड आणण्यासाठी पाठवले. साईल तिथे सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी पोहोचला. तिथे पांढर्‍या कारमधून आलेल्या व्यक्तीने पैशांनी भरलेल्या दोन बॅगा साईलकडे दिल्या.

गोसावी हा पडद्यामागून खंडणी वसूल करत होता. त्याच्या सांगण्यावरून साईलने नोटांनी भरलेल्या दोन बॅगा त्याला दिल्याचे चॅटवरून स्पष्ट होते.

कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आणखी तपशील समोर

किरण गोसावी : (छायाचित्रे पाठवल्यानंतर) कोणासमोर ओपन करू नकोस. सामान्य माणसासारखा वाग.
प्रभाकर साईल : येस सर.
गोसावी : आली का? काय घातले आहे?
साईल : शॉर्ट ड्रेस आहे, पिंक.
गोसावी : (फोटो पाठवून) ही आहे का?
साईल : व्हाईट टी-शर्ट, फुल दाढी आहे, तो…?
या चॅटमधून गोसावी साईलकडून यादीतील लोकांची ओळख पटवून घेत होता. छापेमारीनंतर गोसावीने साईलला संदेश पाठवला; ‘भेटला तो. आतापर्यंत 12 पकडले आहेत.”
साईल : (फोटो पाठवत) हाच तो ना?
गोसावीने दुपारी 4 वाजून 23 मिनिटांनी एकूण 13 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती साईलला दिली होती.

गोसावी : हाजी अलीला जा आणि सांगितलेले काम पूर्ण कर. नंतर तिथून घरी परत ये.
साईल : हो सर.
गोसावी : बाहेरून कुलूप लाव आणि चावी खिडकीतून हॉलमध्ये फेक.
साईल : ठीक आहे.
गोसावी : लवकर जा आणि लवकर परत ये.

Back to top button