मुंबईत नवरात्रीत येणार गुजराती कलावंत | पुढारी

मुंबईत नवरात्रीत येणार गुजराती कलावंत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  येत्या रविवारपासून (१५ (ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील गरबा आणि रास-दांडियाप्रेमी तसेच आयोजक सज्ज असून गुजरातमधील काही प्रख्यात लोककलाकार मुंबापुरीमध्ये येणार आहेत.

संपूर्ण देशभरातील गरबा आणि रास दांडियाप्रेमींना उत्सुकता लागून राहिलेल्या नऊ दिवसांच्या शारदीय नवरात्रोत्सवाला काही दिवस उरले आहेत. यंदाच्या उत्सवात मुंबईसह गुजरातमधील अव्वल दर्जाचे कलाकार मुंबई आणि शहराबाहेरील भव्य कार्यक्रमांमध्ये अदाकारी पेश करतील. त्यात गरबा क्वीन फाल्गुनी पाठक हिच्यासह मुसा पाईक, प्रीती पिंकी, पार्थिव गोहिल आणि गुजरातमधील प्रख्यात लोककलाकार गीता रबारी आदींचा समावेश आहे. शनिवारपर्यंत सर्व कलाकार दाखल होतील, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

आगामी निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्ष गरबा आणि रास-दांडियाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. त्यात राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी मीरा भाईंदर येथील लोटस ग्राऊंडवर आयोजित केलेल्या गरबा आणि दांडियाला गायक मुसा पाईक याची प्रमुख उपस्थिती असेल.

मीरा भाईंदरमधील रहिवाशांना सेव्हन स्क्वेअर शाळेजवळील एमबीएमसी मैदानावर होणाऱ्या प्रीती-पिंकी गरब्याचा आस्वाद घेता येणार आहे. या गरब्यामध्ये सर्वांना मोफत प्रवेश द्यावा, अशी विनंती आयोजकांना केली. त्यांनी ती मान्य केल्याचे प्रीती यांनी सांगितले. शिव- सेनेचे (शिंदे गट) आमदार प्रताप सरनाईक या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये होणाऱ्या ‘रंगीलो रे’ गरब्याचा स्टार हा गायक पार्थिव गोहिल आहे. नेस्को सेंटरमधील १ लाख ६६ हजार चौरस फूट क्षेत्रफळात रंगणाऱ्या गरबा आणि दांडियामध्ये ८ ते १० हजार लोक सहभागी होतील. दांडिया प्रेमींसाठी संपूर्ण परिसर कार्पेट आहे. आम्ही पारंपरिक संगीतावर अधिक लक्ष केंद्रित करतो. कारण गुजराती आणि कॉस्मोपॉलिटन भागांमधून येणाऱ्यांना हा संगीत प्रकार प्रामुख्याने आवडतो.

दरम्यान, बोरिवली येथील प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी आयोजित केलेल्या गरब्यामध्ये गरबा क्वीन फाल्गुनी पाठक प्रमुख आकर्षण आहे. फाल्गुनीला मुंबईकरांची आवड माहीत आहे. ती मराठी अभंगही गाते आणि लोक ‘विठ्ठल विठ्ठल’ च्या जयघोषाचा आनंद घेतात. त्यामुळे आमच्या गरब्याला मोठा प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आयोजक संतोष सिंग यांनी व्यक्त केला आहे.

दांडिया आयोजकांना रुग्णवाहिका बंधनकारक

 मुंबईसह राज्यभरात नवरात्रीच्या निमित्ताने रास दांडियाचे आयोजन करणाऱ्या आयोजकांना आता सहभागी होणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे बंधनकारक होणार आहे. सर्व दांडिया आयोजकांना यंदा आयोजनाच्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य सुविधा आणि रुग्णवाहिका तैनात ठेवणे बंधनकारक करण्यात आले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याबाबत निर्देश दिले. येत्या १५ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात होत आहे.

Back to top button