मुंबई : डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाइटच्या वापरावर तातडीने निर्बंध आणा : विजय वडेट्टीवार | पुढारी

मुंबई : डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाइटच्या वापरावर तातडीने निर्बंध आणा : विजय वडेट्टीवार

मुंबई : पुढारी वृत्‍तसेवा राज्यात डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडीमुळे रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, गर्भवती स्त्रिया यांचे आरोग्य धोक्यात येत असून, त्याचे स्पष्ट परिणाम दिसू लागले आहेत. डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. तर लेझरमुळे अनेकांना नेत्रविकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे धोकादायक बनलेल्या डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाइटच्या वापरावर सार्वजनिक ठिकाणी कठोर निर्बंध आणण्याची आवश्यकता आहे. या विषयाची शासनाने गंभीर दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.

महाराष्ट्राला सण, उत्सव, यात्रा यांची मोठी परंपरा आहे. त्याचा सार्थ अभिमान आपल्या सर्वांनाच आहे. हे सण, उत्सव साजरे करताना कोणतीही हानी होणार नाही, सर्वसामान्य जनता, रुग्ण, लहान बालके, गरोदर माता आणि ज्येष्ठांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

डॉल्बीच्या आवाजाचा प्रचंड त्रास रुग्णालयात व घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना, ज्येष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान बालकांना होतो हे मान्य केले पाहिजे. कधी कधी लहान बालकांचे आणि ज्येष्ठांचे हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो, कानाच्या पडद्यावर आघात होतात आणि याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे या विषयाची सरकारने तातडीने दखल घ्यावी.

हिंजवडीत योगेश अभिमन्यू साखरे या तरुणाचा, तासगाव येथे शेखर सुखदेव पावशे या तरुणाचा डॉल्बीच्या तीव्र आवाजाने हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला. वाळवा तालुक्यातील दुधारी येथे (३५ वर्षीय) प्रवीण शिरतोडेचाही असाच डॉल्बीच्या आवाजामुळे मृत्यू झाला. राज्यातील काही भागात निमित्त साधून डॉल्बी लावण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. यापूर्वी देखील राज्यात डॉल्बीच्या तीव्र आवाजाचा हृदयावर गंभीर परिणाम होउन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत.

पोलिसांकडून काही वेळा जनआग्रहास्तव आवाजाच्या मर्यादा पाळण्याच्या अटीवर परवानगी दिली जाते. पण ही मर्यादा पाळली जात नाही, हे उघड सत्य आहे. १०० किंवा त्यापेक्षा जास्त डेसिबलपर्यंत हा आवाज जातो. त्यामुळे रुग्णांना, ज्येष्ठांना, बालकांना किंवा इतरही लोकांना हृदयाचा आणि कानांचा त्रास होतो. कधी कधी जीवित हानी होते हे गंभीर आहे.

अनेक मिरवणुकांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये लेझर प्रकाशझोत आकाशाच्या दिशेने आणि जमलेल्या लोकांच्या अंगावरून फिरवला जातो. लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटमुळे कायमचे अंधत्व येण्याचा धोका असतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन डॉल्बी, लेझर प्रकाशझोत आणि एलईडी लाईटचा सार्वजनिक ठिकाणी वापर करण्याबाबत कठोर निर्बंध आणण्याची व याबाबतचे कठोर नियम करण्याची आवश्यकता आहे. सरकारने पुढाकार घेऊन याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button