दिवसाकाठी वर्षाखालील 40 बालकांचा जातो जीव! | पुढारी

दिवसाकाठी वर्षाखालील 40 बालकांचा जातो जीव!

मुंबई : राज्यातील सरकारी रुग्णालयांतील मृत्यूच्या तांडवाच्या बातम्यांनी वृत्तपत्रांची रकाने भरली जात असतानाच आता महाराष्ट्रात दिवसाकाठी 40 नवजात बालकांचा मृत्यू होत असल्याची आकडेवारी समोर आली आहे. यातील दोन तृतीयांश म्हणजेच तब्बल 25 हून अधिक बालके एक महिन्याहूनही कमी वयाची असतात, असे ही आकडेवारी सांगते.

नांदेडमध्ये रुग्णालयात तीन दिवसांपूर्वी 24 तासांत 24 मृत्यू झाले होते. यात 12 बालकांचा समावेश होता आणि या सर्वांचेच वय एक ते तीन दिवसांचे होते. नवजात बालकांपैकी सहा जणांना श्वसनाचा त्रास होता. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालय अर्थात घाटीमध्येही 24 तासांत 18 जण दगावले. त्यातही दोन अकाली जन्मलेली बालके होती. हे पाहता संबंधित रुग्णालयात कृत्रिम श्वसन यंत्रणा आणि तिच्या वापरासाठी प्रशिक्षित वरिष्ठ कर्मचारी आहेत का, हे तपासण्याची गरज निर्माण झाल्याचे एका इंग्रजी दैनिकाच्या वृत्तात म्हटले आहे.

सरकारी रुग्णालये म्हणून सर्व रुग्णांची काळजी घेणे आणि त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे, यासाठी आम्ही वचनबद्ध असतो; पण दुर्दैवाने या क्षेत्रात नवजात बालकांसाठी सुविधा मर्यादित आहेत, ज्यामुळे आव्हाने आणखी वाढतात.
– डॉ. राजेंद्र सावजी, बालरोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख, जीएमसीएच नागपूर

बहुतेक मृत्यू प्रकरणांमध्ये गंभीर रुग्णांचे उशिरा रेफरल हे प्रमुख कारण आहे. रुग्ण उशिरा दाखल झाल्याने डॉक्टरांना त्याचे जीवन वाचवण्याचे प्रयत्न करण्यात खूपच कमी वेळ मिळतो.
– मिलिंद म्हैसकर, अतिरिक्त मुख्य सचिव (सार्व.आरोग्य)

नवजात मुलांच्या जास्त मृत्यूचे मुख्य कारण म्हणजे, एनआयसीयू आणि प्रशिक्षित कर्मचारी यांची अपुरी संख्या. राजकीय फायदा नसल्याने आरोग्य क्षेत्राला कमी प्राधान्य दिले जाते. परिणामी, आरोग्य क्षेत्राला अर्थसंकल्पात जेमतेम 4 टक्के हिस्सा दिला जातो.
– डॉ. रवी दुग्गल, आरोग्य अर्थशास्त्रज्ञ

Back to top button