जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्य:स्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथील घाटी आणि नागपूर जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचा मुद्दा तापला असून राज्यातील अन्य रुग्णालयातील दुरवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकार्‍यांशी दूरद़ृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यापुढे जिल्हाधिकार्‍यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या.

अहवालानंतर दोषींवर कारवाई

नांदेड आणि घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला. औषध खरेदीबाबत जिल्हाधिकार्‍यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

…तर अधिकार्‍यांना जबाबदार धरणार

विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी एक टीम म्हणून आरोग्य यंत्रणेचे काम करावे, आवश्यक निधी आणि अतिरिक्त साधनसामग्रीची मागणी आल्यास ती तत्काळ पुरविण्यात यावी. मनुष्यबळ कमी असल्यास आऊटसोर्सिंग करण्याचे अधिकारही जिल्हास्तरावर दिले आहेत. त्यामुळे दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यात विलंब झाल्यास संबंधितांना जबाबदार धरून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news