मुंबई : दिल्ली येथे दोन दिवस आयोजित केलेल्या केंद्र सरकारच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र दोनच दिवसात शिंदे यांचा दुसरा दिल्ली दौरा असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले होते. तिथे त्यांची भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली. त्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्या दिल्लीत दहशतवादविरोधी परिषद आयोजित केली आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली. एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीत राजकीय चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.