तुमच्या दबावाला, धमक्यांना घाबरत नाही; नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावले | पुढारी

तुमच्या दबावाला, धमक्यांना घाबरत नाही; नार्वेकरांनी ठाकरे गटाला सुनावले

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आमदार अपात्रता याचिकांवरील सुनावणीच्या मुद्दयावरून शिवसेना ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी प्रत्युत्तर दिले. काही लोक विविध माध्यमांतून आरोप करीत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत; पण या धमक्यांना घाबरणार नाही. दबावालाही बळी पडणार नाही, नियमानुसारच निर्णय घेतला जाईल, असा इशारा नार्वेकर यांनी ठाकरे गटाला दिला आहे.

अपात्रतेच्या निर्णयाबाबत चालढकल केली जात असल्याच्या आरोपावर नार्वेकर म्हणाले, अनेक लोकांकडून माझ्या निर्णय प्रक्रियेवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे; पण मी कायदा, नियम व संविधानातील तरतुदींनुसारच निर्णय घेणार. कुणी, कितीही प्रभावित करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले, तरी मी नियमानुसारच काम करेल.

संविधानाचे, नियमाचे ज्ञान नाही, अशा लोकांनी केलेल्या टिपणीबद्दल बोलण्यात वेळ घालवणे योग्य नाही. निर्णय घेण्यात मी दिरंगाईही करणार नाही. घाईही करणार नाही. नियमांचे पालन केले जाणार. आवश्यकता असलेल्यांना नैसर्गिक न्यायाची संधी दिली जाणार. मूळ राजकीय पक्ष कोणता, यावरही मला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे त्याच्याशी संबंधित सर्व लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासंदर्भात कार्यवाही केली जाईल, असेही नार्वेकरांनी सांगितले.

Back to top button