Karan Sajnani : एनसीबीचे करन सजनानी याला समन्स

Karan Sajnani : एनसीबीचे करन सजनानी याला समन्स
Karan Sajnani : एनसीबीचे करन सजनानी याला समन्स
Published on
Updated on

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : NCB summons Karan Sajnani : कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील पंच प्रभाकर साईल यांची सलग दोन दिवस कसून चौकशी केल्यानंतर आता केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या (एनसीबी) विशेष पथकाने करन सजनानी याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. सजनानी याच्या चौकशीमधून काही अधिक महत्वपूर्ण माहिती एनसीबीच्या हाती लागल्यास येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी कारवाईनंतर एनसीबीच्या मुंबई विभागावर आरोपांच्या फैरी सुरु झाल्या. अखेर एनसीबीने पाच सदस्यीय पथकाच्या माध्यमातून चौकशी सुरू करत एनसीबी मुंबईकडील सहा प्रकरणे सखोल तपासासाठी दिल्लीच्या विशेष पथकाकडे सोपविली आहे. एनसीबीच्या या पथकाने कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणातील आरोपी अरबाज मर्चंट आणि अर्चित कुमार याची चौकशी केल्यानंतर आर्यन खान याला चौकशीला समन्स बजावले आहे. तर, याच प्रकरणात पंच प्रभाकर साईल याची सलग दोन दिवस कसून चौकशी केली आहे. तसेच एनसीबीने आणखी दोन साक्षीदारांचा मंगळवारी जबाब नोंदविला असून आणखी काही साक्षिदारांना चौकशीला बोलावल्याचे एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी सांगितले.

तर, एनसीबीची कारवाई आणि एनसीबीच्या मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर सतत आरोप करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना अटक झालेल्या प्रकरणातील आरोपी करन सजनानी याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे. एनसीबीने बॉलिवूडमधील ड्रग्ज सिंडिकेटची पाळेमुळे खोदत असताना एका कारवाईत ब्रिटिश नागरीक आणि मुंबईतील मिलेनियर याच्या इंटरनॅशनल अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत एनसीबीने सजनानी याच्यासह बॉलिवूडमधील एका बड्या सेलिब्रिटीची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि तिची बहीण सैष्ठा फर्निचरवाला यांना अटक केली.

करन सजनानी याच्या चौकशीतून मुच्छड पानवाल्याच्या मुलाला आणि त्यानंतर समीर खान यांनाही एनसीबीने अटक केली. करन सजनानी आणि समीर खान यांच्यात गुगल पे च्या माध्यमातून 20 हजार रुपयांचे आर्थिक व्यवहार झाले. ड्रग्ज व्यवहारात ही पैशांची देवाण-घेवाण झाल्याच्या संशयातून तपास करत एनसीबीने ही कारवाई केली होती. आता एनसीबीच्या विशेष पथकाला सजनानी याची पुन्हा चौकशी करायची आहे. त्याच्या चौकशीत एनसीबीच्या विशेष पथकाच्या हाती काही अधिक माहिती, पुरावे लागल्यास याप्रकरणात समीर खान यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
……………………..
एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांनी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांची मंगळवारी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात झालेल्या आरोपांच्या तपासाबाबत चर्चा झाल्याचे समजते. तसेच, एनसीबीच्या विशेष पथकाला याप्रकरणात काही ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आवश्यक आहे. ते एनसीबीने मुंबई पोलिसांकडे मागितल्याची माहिती मिळते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news