नव्या वर्षात चार मोठे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत ! | पुढारी

नव्या वर्षात चार मोठे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत !

प्रसेनजीत इंगळे

मुंबई : रस्ते, रेल्वे असो वा हवाई वाहतूक, मुंबईकरांच्या नशिबी कोंडी ही ठरलेलीच. पण नव्या वर्षांत या कोंडीतून मुंबईकरांची बऱ्यापैकी सुटका होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षात होणाच्या लोकसभा निवडणुकीआधीच मुंबईचा चेहरामोहरा बदलणारे चार मोठी प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत रूजू होवू घातले आहेत

सुमारे ८२ हजार कोटी रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, कोस्टल रोड मुंबई मेट्रो लाईन – ३ व नवी मुंबई विमानतळ या चार प्रकल्पांचे काम अंतिम टप्प्यात आहे. नव्या वर्षात ते सार्वजनिक सेवेत येतील. मुंबईच्या विकासाला चालना देणाऱ्या या प्रकल्पांमुळे मुंबईतील घरांच्या किमती दुपटीने वाढतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

२०२४ हे निवडणुकीचे वर्ष आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारसाठी हे चारही प्रकल्प अतिशय महत्वाचे आहेत. यामुळे ते नियोजित वेळेत
पूर्ण करण्यासाठी शासनाकडून विशेष मदत केली जात आहे. दुसरीकडे, येत्या ३ ते ५ वर्षात मुंबईला इतर शहरांशी जोडणाऱ्या आणखी काही प्रकल्पांची भर पडणार आहे. यात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचाही समावेश आहे. हे प्रकल्प कार्यरत झाल्यावर मुंबईतील
पायाभूत सेवांमध्ये भर पडून मुंबईकरांचे राहणीमान उंचावणार आहे..

मुंबई ट्रान्सहार्बर लिंक

  • डिसेंबर २०२३ मध्ये शिवडी- न्हावाशेवा सागरी सेतूच्या पूर्णत्वाचे नियोजन
  • देशातील सर्वात लांब सेतू
  • लांबी २१.८० किमी
  •  उभारणी एमएमआरडीए, पुलावर सहा मार्गिका
  • दररोज ७० हजार वाहनांची वाहतूक अंदाजित
  • मुंबई- नवी मुंबई अंतर दोन तासांनी घटणार
  •  नवी मुंबई, पनवेल, कर्जत, कल्याण, बदलापूर, तुर्भे, डोंबिवली, घणसोली, ऐरोली, उलवे, द्रोणागिरी, अंबरनाथ व वसई परिसराला पर्याय उपलब्ध होईल.

कोस्टल रोड प्रकल्प (पहिला टप्पा)

  •  मरीन ड्राइव्हला वांद्रे-वरळी सी लिंकशी जोडणार
  • बृहन्मुंबई महापालिकेचा उपक्रम
  • लांबी १०.५८ किमी.
  • गिरगाव वरळी प्रवास फक्त १० मिनिटांचा होणार
  • नोव्हेंबर २०२३ मध्येच पूर्णत्वाचे नियोजन, पण उशीर
  • आता मे २०२४ मध्ये खुला होणे अपेक्षित
  •  ७६ टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
  • भराव टाकण्याचे काम ९६ टक्के पूर्ण
  •  समुद्री भिंत बांधण्याचे काम ८५ टके पूर्ण.

मेट्रो प्रकल्प ३

  • आरे ते कफ परेड
  •  लांबी ३३.५ किमी
  • भारतातील पहिली भूमिगत मेट्रो मार्गिका
  • पहिला टप्पा आरे ते बीकेसी
  • दुसरा टप्पा बीकेसी तेकफपरेड
  •  एकूण २७ स्थानके
  • पहिला टप्पा डिसेंबर २०२३ तर दुसरा टप्पा जून २०२४ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन.
  • दुसऱ्या टप्प्याचेही ७९ के काम पूर्ण
  •  येत्या वर्षात मुंबईकरांना भूमिगत मेट्रो रेल्वेची सेवा अनुभवता येणार

नवी मुंबई विमानतळ

  • मुंबईतील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ
  • अदानी समूहाकडून उभारणी
  •  काम अंतिम टप्प्यात.
  •  दरवर्षी ९० दशलक्ष प्रवासी हाताळण्याची क्षमता
  •  ताशी ८० उड्डाणे भरारी घेणार
  •  यामुळे मुंबईत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ होतील.
  • शिवडी न्हावा सेवा सी लिंक, मुंबई तसेच नवी मुंबई मेट्रो व दोन खाडी मार्गाने जोडले जाणार.
  • डिसेंबर २०२४ मध्ये खुला होण्याची अपेक्षा. मात्र, निवडणूक पाहता मे २०२४ पर्यंत उद्घाटन लांबणार.

Back to top button