Mumbai News : मुंबई भाजप अध्यक्ष कोण, शेलार की लोढा ? | पुढारी

Mumbai News : मुंबई भाजप अध्यक्ष कोण, शेलार की लोढा ?

राजेश सावंत

मुंबई :  भाजपच्या एका गटाकडून मंगलप्रभात लोढा यांचे महत्त्व वाढवून अॅड. आशिष शेलारांचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील प्रश्नाबाबत नेहमी अग्रेसर असलेले शेलार सध्या फारसे सक्रिय दिसत नाहीत. उलट मुंबई महापालिकेबाबत फारशी माहिती नसलेले लोढा शहरातील प्रत्येक प्रश्नाबाबत पुढाकार घेताना दिसत आहेत. त्यांनी पालिका आयुक्तांसह प्रशासनाचा ताबाच घेतला आहे. त्यामुळे मुंबई भाजप अध्यक्ष कोण, शेलार की लोढा, असा प्रश्न सामान्य कार्यकत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे शेलार यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे काही माजी लोकप्रतिनिधी लोढांच्या भोवती पिंगा घालताना दिसत आहेत.

मुंबई महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांचा पत्ता चालला. मुंबईत ३० ते ३२ नगरसेवक निवडून येत असताना २०१७ मध्ये शेलार यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे तब्बल ८२ नगरसेवक निवडून आले. २०१७ मध्येच भाजपची महापालिकेत सत्ता येणार होती. पण त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी मैत्री जपण्यासाठी ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता सोडावी लागल्याची चर्चा रंगली होती. यावेळी भाजपच्या एकहाती सत्तेसाठी मुंबई अध्यक्षपदाची सूत्रे पुन्हा शेलारांकडे सोपवण्यात आली. पण भाजपच्या एका गटाने शेलारांना सक्रिय राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी मंगलप्रभात लोढा यांचा पर्याय उभा केल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे मंत्री असूनही लोढा यांचा मुंबई महापालिकेतील वावरच नाही, तर हस्तक्षेपही वाढला आहे.

मैदानांच्या दत्तक धोरणाबाबत शेलार यांचा गाढा अभ्यास असूनही लोढा यांनी या धोरणाबाबत बैठक घेतली. भाजपच्या माजी नगरसेवकांच्या प्रभागांत किती निधी द्यायचा, हे लोढाच ठरवत आहेत. लोढा यांचे महत्त्व वाढत असताना, मुंबईतील सक्रिय राजकारणातून शेलार सध्या दूर असल्याचे दिसून येत आहे. २०१७ मध्ये मुंबई भाजप अध्यक्षपदी असताना शेलार यांच्या हातात महापालिकेची पूर्ण सूत्रे होती. मात्र आता ते नामधारी अध्यक्ष असल्याचे स्पष्ट होते.

शेलारांना दूर ठेवून मुंबई महापालिकेवर कमळ फुलवण्यासाठी भाजपच्या एका गटाचे प्रयत्न सुरू आहेत. मंत्रिपदापासून दूर ठेवल्यावर आता मुंबईतील त्यांचे अस्तित्व संपवण्यासाठी भाजपच्या खासदार, आमदारांसह काही माजी नगरसेवकांनाही हाताशी धरण्यात आल्याचे समजते. त्यामुळे शेलारांचे कट्टर समर्थक असलेले काही माजी लोकप्रतिनिधी सध्या लोढा.. लोढा.. जप करताना दिसून येत आहेत

Back to top button