मुंबई; पुढारी वृत्तसेवा : जवळपास सर्वच क्षेत्रांमध्ये महिला नेतृत्व दिसून येत आहे. भुलेश्वर येथील शिवगर्जना गणेश उत्सव मंडळाचा कारभारही महिलांनी हाती घेतला असून या शिवगर्जना गणेशोत्सव मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विशेष म्हणजे वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी येथील व्यापाऱ्यांचा या महिलांना सक्रीय पाठिंबा मिळत आहे.
काळबादेवी जवळच्या भुलेश्वर मार्केटमधील तिसरा भोईवाडा येथील शिवगर्जना गणेश उत्सव मंडळाची सूत्रे गेल्या चार वर्षापासून सात महिलांनी आपल्या हाती घेतली आहेत. शोभा सावंत, सविता केसरकर, ज्योती परब, पार्वती पाटील, सुभद्रा पाटील या शिवगर्जना
गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य पदाधिकारी आहेत. गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते त्याच्या शेजारी या महिलांचे हार, फळे, फुले आणि विविध वस्तू विकण्याची दुकाने आहेत. तर एक महिला भाजी विकण्याचे काम करते. वेगवेगळ्या भागांमधून भुलेश्वर येथे येऊन या महिला व्यवसाय सांभाळतात. दरम्यान, या महिलांच्या गणपती मंडळाला सर्वांचा पाठिंबा मिळत असून कौतुकही होत आहे.
याबाबत माहिती देताना ज्योती परब म्हणाल्या की, गणपतीचा मंडप, आरास, आगमन सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विसर्जन मिरवणूक यांचे आयोजन आम्ही करतो. त्यातून आम्हाला मानसिक समाधान मिळते. मनाला शांती लाभते. यापूर्वी या गणेशोत्सवाकडे फारसे कुणी लक्ष देत नव्हते. म्हणून आम्ही या मंडळाचा कारभार आमच्या हाती घेतला. तेव्हापासून सर्व व्यवहार चोख होत आहेत. भाविकांची गर्दीही वाढत आहे.