मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या माननीय लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह है गुंफणार आहेत.
शनिवारी सायंकाळी ५ वाजता मुंबई विद्यापीठाच्या सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात या स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनानाथ ठाकुर यांच्या उपस्थित राहणार आहेत.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दिवशी गौरी गणपती विसर्जन असताना कर्मचाऱ्यांना बोलवून वेठीस धरले जात असल्यामुळे युवासेना (उबाठा) माजी सिनेट सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच केवळ राजकारण करण्यासाठी असे कार्यक्रम राबवले जात असल्याची टिकाही युवासेनेने केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी मुंबई दौऱ्यावर असून दरवर्षीप्रमाणे यंदाही ते लालबागचा राजाच्या दर्शनासाठी जाणार आहेत.