किशोरी पेडणेकर यांची दोन तास चाैकशी | पुढारी

किशोरी पेडणेकर यांची दोन तास चाैकशी

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोविड काळात घडलेल्या कथित शव पिशवी खरेदी घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या माजी महापाैर किशोरी पेडणेकर यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेशाखेने बुधवारी दोन तास चाैकशी केली. पेडणेकर यांची याप्रकरणात ही दुसऱ्यांदा चाैकशी झाली असून त्यांना १६ सप्टेंबरला पून्हा चाैकशीला हजर रहावे लागणार आहे.

आर्थिक गुन्हे शाखेने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयाने पेडणेकर यांना अटकेपासून दिलासा देत ११, १३ आणि १६ सप्टेंबरला चाैकशीला हजर रहाण्यास सांगितले होते. त्यानुसार, पेडणेकर या सोमवारी चाैकशीला हजर राहिल्या. तेव्हा त्यांची दोन तास चाैकशी करण्यात आली. त्यानंतर, बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्या पून्हा मुंबई पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हेशाखेच्या कार्यालयात हजर झाल्या. त्यांची दोन तास चाैकशी करुन जबाब नोंदविण्यात आला. यावेळी पेडणेकर यांनी काही कागदपत्रेही अधिकाऱ्यांसमोर सादर केल्याची माहिती मिळते.

कोरोना काळात कोविड केंद्र उभारणीसह वैद्यकीय साहित्य, उपकरणे, अाैषध खरेदी आणि डाॅक्टर पुरवठा अशा मुंबई महानगर पालिकेकडून देण्यात आलेल्या विविध प्रकारच्या कंत्राटांमध्ये मोठ्याप्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्या होत्या. यातील शव पिशवी खरेदी प्रकरणात प्राथमिक तपास करुन आर्थिक गुन्हेशाखेने एकूण ४९.६३ लाख रुपयांच्या फसवणूकीप्रकरणी पेडणेकर यांच्यासह दोन पालिका अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीच्या संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button