कुणबी-मराठा आरक्षणाचे काम पाच बैठकांत पूर्ण होणार | पुढारी

कुणबी-मराठा आरक्षणाचे काम पाच बैठकांत पूर्ण होणार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची पहिली बैठक सोमवारी मंत्रालयात पार पडली. या समितीच्या पाच बैठका होण्याची शक्यता असून, या बैठकांत कामकाज पूर्ण करून सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे.

मराठवाड्यातील कुणबी-मराठा आरक्षणासंदर्भात महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने यासंदर्भात गोळा केलेली सर्व कागदपत्रे आणि माहिती निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांना आज झालेल्या बैठकीत सादर केली. निजामकाळात मराठवाड्यातील मराठा कुणबींची लोकसंख्या 38 टक्क्यांच्या आसपास होती. त्यानुसार समितीने कागदपत्रे तयार केली असल्याचे महसूल विभागातील सूत्रांनी सांगितले. निजामकालीन नोंदी तसेच तेलंगणातील मराठ्यांना ओबीसीअंतर्गत देण्यात आलेले आरक्षण अशा सर्वच कागदपत्रांचा अभ्यास करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी आरक्षण लागू केल्यास इतर राज्यांमध्येही मराठा समाजाकडून ओबीसी समावेशाची मागणी होण्याची शक्यता असल्याचे अधिकार्‍याने सांगितले.

Back to top button