विधान परिषदेतील अजित पवार गटाचे ५ आमदार अपात्र ठरवा | पुढारी

विधान परिषदेतील अजित पवार गटाचे ५ आमदार अपात्र ठरवा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार गटातील ४१ आमदारांच्या अपात्रतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच, आता विधान परिषदेतील या गटाच्या पाच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार) उपसभापतींकडे सोमवारी दोन स्वतंत्र अर्ज केले आहेत. या अर्जांवर आठवडाभरात सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

राष्ट्रवादीचे दोन्ही गट फूट पडली नसल्याचे सांगत असले, तरी दोन्ही गटांकडून एकमेकांना शह-काटशह देण्याचे काम सुरू आहे. पक्ष आणि चिन्ह आपल्याच ताब्यात राहावे, यासाठी दोन्ही गटांकडून कसून प्रयत्न सुरू आहेत. अशातच शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटाच्या ४१ आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली असतानाच, आता विधान परिषदेतीलही ५ आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांच्याकडे अर्ज केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या अर्जात आमदार सतीश चव्हाण, अनिकेत तटकरे, विक्रम काळे आणि अमोल मिटकरी यांचा, तर पक्षाचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या अर्जात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचा उल्लेख केला आहे. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन लवकरच आठवडाभरात सुनावणी घेतली जाणार आहे.

शिवसेना आमदार अपात्रतेवर १४ सप्टेंबरपासून सुनावणी

शिवसेना शिंदे गटाच्या ४० आमदारांची आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुनावणी १४ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. राज्य विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात ही सुनावणी होणार असून, एकाच दिवशी ५४ आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. त्यासाठी दोन्ही गटांच्या आमदारांना उपस्थित राहावे लागणार आहे.

Back to top button