

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबई शहरातील महामार्गासह प्रमुख रस्त्याची पहाटेच्या वेळी स्वच्छता करण्यासाठी महापालिकेने ४० ते ५० लाख रुपये खर्च करून यांत्रिकी झाडू खरेदी केल्या आहेत. या यांत्रिकी झाडूची देखभाल करण्यासाठी आता पालिका कंत्राटदारावर तब्बल ७ कोटी रुपयाची उधळपट्टी करणार आहे. सात वर्षासाठी हे कंत्राट देण्यात येणार असून यासाठी निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वने व जलवायु परिवर्तन मंत्रालयाच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम नावाचा पंचवार्षिक कार्यक्रमाच्या निधीतून मुंबई महापालिकेने दोन यांत्रिक झाडूंची खरेदी केली. या यांत्रिक झाडुच्या खरेदीनंतर एक वर्षांचा देखभालीचा कालावधी संपल्यामुळे झाडूच्या देखभालीसाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. पुढील सात वर्षांसाठी यांत्रिक झाडूंची देखभालीसाठी ७ कोटी ३० लाख ७७ हजार रुपये खर्च केले जाणार आहे. निविदा प्रक्रिया अंतिम झाल्यानंतर या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देऊन कंत्राटदारावर जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. दरम्यान प्रशासकीय मंजुरी मिळेपर्यंत कंत्राटदारावर चार महिन्याचे काम करण्याची जबाबदारी सोपवली आहे.
४०-५० लाख रुपयामध्ये खरेदी करण्यात आलेल्या या यांत्रिकी झाडूच्या देखभालीसाठी तब्बल सात कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च होणार असल्यामुळे मुंबईकरांना आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. झाडूच्या देखभालीवर सात कोटी खर्च करण्यापेक्षा नवीन झाडू खरेदी करणे, आर्थिकदृष्ट्या परवडणारे आहे. पण कंत्राटदाराचे किसे भरण्यासाठी अशाप्रकारे प्रस्ताव आणून पालिकेची पर्यायाने करदात्या मुंबईकरांची लूट केली जात असल्याची चर्चा पालिका कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे.