India Alliance : ‘इंडिया’ आघाडीत 14 जणांची समन्वय समिती | पुढारी

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीत 14 जणांची समन्वय समिती

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : आगामी लोकसभा निवडणुकीला एकजुटीने सामोरे जाण्याचा संकल्प ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीच्या नेत्यांनी शनिवारी बैठकीत केला. त्यासाठी ‘जुडेगा भारत, जीतेगा इंडिया’चा नारा यावेळी देण्यात आला. मात्र, पंतप्रधानपदाचा चेहरा मात्र त्यांना ठरवता आला नाही.

आगामी निवडणुकांची रणनीती ठरवण्यासाठी 14 जणांच्या समन्वय समितीसह पाच विविध समित्यांची घोषणा करण्यात आली. दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी याच महिन्यात (सप्टेंबर) जागावाटपावर निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाळ, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह 14 जणांचा समन्वय समितीत समावेश आहे. ‘इंडिया’ आघाडीची तिसर्‍या बैठकीची सांगता शुक्रवारी मुंबईत झाली. बैठकीत ‘इंडिया’च्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यासाठी काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे नाव पुढे करण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्याचबरोबर ममता बॅनर्जी, नितीशकुमार यांच्या नावांचीही चर्चा होती. परंतु, पंतप्रधानपदासाठीच्या नावाबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचे समजते.

निवडणुकीसाठी समित्या स्थापन करून विविध पक्षांच्या नेत्यांना यामध्ये स्थान दिले आहे. प्रामुख्याने समन्वय समिती आणि निवडणूक रणनीती समिती महत्त्वाची मानली जात आहे. समन्वय समितीत के. सी. वेणुगोपाळ, शरद पवार यांच्यासह टी. आर. बालू (डीएमके), हेमंत सोरेन (जेएमएम), तेजस्वी यादव (राजद), अभिषेक बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), राघव चढ्ढा (आप), जावेद अली खान (सप), लल्लन सिंग (जदयु), डी. राजा (सीपीआय), ओमर अब्दुला (नॅशनल कॉन्फरन्स), मेहबुबा मुफ्ती (पीडीपी). ‘सीपीआयएम’कडून लवकरच नाव निश्चित केले जाणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

19 सदस्यांची प्रचार समिती

बैठकीत निश्चित करण्यात आलेली 19 सदस्यांची प्रचार समिती पुढीलप्रमाणे आहे. गुरदीपसिंग सापल (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट), संजय झा (जदयु), पी. सी. चाको (राष्ट्रवादी काँग्रेस), चंपाई सोरेन (जेएमएम), किरणोमय नंदा (सप), संजय सिंग (आप), अरुण कुमार (सीपीआयएम), बिनोय विश्वम (सीपीआय), हसनेन मसुदी (नॅशनल कॉन्फरन्स), शाहिद सिद्दकी (आरएलडी), एन. के. प्रेमाचंद्रन (आरएसपी), जी. देवराजन (एआयएफबी), रवी राय (सीपीआय), के. एम. कादर मोईद्दीन (आययूएमएल), जोस मनी (केसीएम), टीएमसी पक्षाकडून नाव निश्चित करण्यात आलेले नाही.

सोशल मीडियासाठी 12 जणांची समिती (India Alliance)

‘इंडिया’ आघाडीने शुक्रवारी सोशल मीडियाची जबाबदारी संभाळण्यासाठी एकूण 12 जणांची समिती जाहीर केली आहे. त्यात सुप्रिया श्रीनाटे, सुमीत शर्मा, आशिष यादव, राजीव निगम, राघव चढ्ढा, आदींचा समावेश करण्यात आला आहे. त्याबरोबरच मीडियासाठीही 19 जणांची समिती जाहीर करण्यात आली आहे. त्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश, मनोज झा, शिवसेनेचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँगे्रसचे जितेंद्र आव्हाड, सपाचे आशिष यादव आदींचा समावेश करण्यात आला आहे.

संशोधनासाठीही समिती

‘इंडिया’ आघाडीने संशोधनासाठीही 11 जणांची समिती जाहीर केली आहे. अमिताभ दुबे, सुबोध मेहता, प्रियंका चतुर्वेदी, वंदना चव्हाण, के. सी. त्यागी, जास्मिन शहा आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Back to top button