पुढारी ऑनलाईन : जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. जनतेने शांतता राखावी. आंदोलनकर्ते उपोषण सोडायला तयार होत नव्हते. त्यादरम्यान, आंदोनलकर्त्यांची प्रकृती खालावत होती. त्यांच्याशी स्वत: मुख्यमंत्री बोलले होते. विविध प्रकारे सरकारचा आंदोलनकर्त्यांशी संवाद सुरू होता. मराठा आरक्षणावर सरकार गांभिर्याने काम करत आहे. पण हा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाशी संबधीत विषय आहे. हा एका दिवसात सुटणारा विषय नसून त्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करावे लगतील,' असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये मराठा आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेनंतर त्यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलतानाही प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'लाठीमाराची घटना दुर्दैवी आहे. मी याबाबत जिल्हाधिकारी, आणि एसपींकडून माहिती घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरंगे पाटील यांच्याशी मी स्वत: चर्चा केली होती. प्रशासनाच्या अधिका-यांसोबतही बोललो होतो. पण मनोज पाटील हे उपोषणाबाबत ठाम होते. अशातच त्यांची प्रकृती खालावत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पाटील यांना एसपी आणि जिल्हाधिका-यांनी रुग्णालयात ॲडमिट व्हावे अशी विनंती केली. पण गुरुवारी घटनास्थळी दगडफेक झाल्याचे एसपी आणि जिल्हाधिका-यांनी माहिती दिली. यानंतर लाठीचार्ज झाला', असे त्यांनी 'पुढारी न्यूज'शी बोलताना सांगितले.
सरकार मराठा समाजाच्या बाजूनेच आहे. विरोधकांनी घटनेचे राजकीय भांडवल करू नये. कुणाच्या जीवशी खेळू नये. जनतेने शांतता राखावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी यावेळी केले.