पुढारी NEWS सर्व्हे : NDA समोर आव्हान हॅटट्रिकचे; INDIA समोर गड भेदण्याचे

पुढारी NEWS सर्व्हे : NDA समोर आव्हान हॅटट्रिकचे; INDIA समोर गड भेदण्याचे
पुढारी NEWS सर्व्हे : NDA समोर आव्हान हॅटट्रिकचे; INDIA समोर गड भेदण्याचे
पुढारी NEWS सर्व्हे : NDA समोर आव्हान हॅटट्रिकचे; INDIA समोर गड भेदण्याचे
Published on
Updated on

पुढारी NEWS : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रावर वर्चस्व राखण्याचे आव्हान भाजपप्रणित NDA समोर आहे; तर या वर्चस्वाला सुरुंग लावण्याचे आव्हान काँग्रेसप्रणित INDIA आघाडीसमोर आहे. येणाऱ्या निवडणुकीत युद्धभूमी पूर्ण बदललेली आहे. महाराष्ट्रावर वर्चस्व गाजविणारी भाजप आणि एकसंध शिवसेना ही युती इतिहासजमा झालेली आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटात ठाकरेंच्या भगव्याला मानाचे स्थान प्राप्त झालेले आहे. फुटलेल्या राष्ट्रवादीचे दोन गट दोन्ही आघाड्यांत विभागले गेलेले आहेत. शिवसेनेचा एक गट भाजपबरोबर आहे, तर दोन निवडणुकांनंतर काँग्रेस दोन हात करण्याच्या मनःस्थितीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा बदललेला सारीपाट रंजक झालेला आहे.

महाराष्ट्र ४८

  • NDA ३६-३२

  • INDIA १२-१६

नरेंद्र मोदी यांचे गारूड जनमानसावर कायम असल्याचे 'पुढारी न्यूज'च्या 'महापोल' या पाहणीत दिसून आलेलेच आहे. २०१४ ला केवळ मोदींच्या चेहऱ्याकडे पाहून भाजप-शिवसेनेला मतदान करणान्यांनी २०१९ ला मात्र प्रखर राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर भाजप- शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली. आज मोदींच्या चेहऱ्याला मान्यता असली, तरीही स्थानिक पातळीवरील घटक कळीचे ठरतील, असे स्पष्ट चित्र या पाहणीत दिसते आहे. महाराष्ट्राने गेल्या दोन निवडणुकांत भाजपप्रणित NDA साठी लाल गालिचा अंथरलेला होता. अशी स्थिती आता नाही, हेही यातून स्पष्ट झालेले आहे. आज लोकसभा निवडणूक झाल्यास राज्यातील ४८ मतदारसंघांचे विभागनिहाय विश्लेषण…

महामुंबई १०

  • NDA ०९-०८

  • INDIA ०१-०२

महामुंबई अर्थात देशाच्या आर्थिक राजधानीवर वरचष्मा राखण्यासाठी घनघोर संग्राम होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही लढत आणखीनच प्रतिष्ठेची आहे. लोकसभेच्या निवडणुकीत तरी मुंबई-ठाणे-पालघरमधील जनता NDA च्याच पारड्यात यश टाकणार, असे स्पष्ट चित्र दिसते आहे. लोकसभेसाठी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाची नौका पार होण्यासाठी लागणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट यांच्या ताकदीचा अभाव दिसतो आहे.

कोकण ०२

  • NDA ०२

  • INDIA 00

कोकणात शिवसेनेचा शिंदे गट, भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला लाभलेली अधिकची कुमक यांमुळे NDA चे निर्विवाद वर्चस्व राहील, असेच आजचे चित्र आहे.

मराठवाडा ०८

  • NDA ०४-०३

  • INDIA ०४-०५

मराठवाड्यातील लोकसभेच्या आठ जागांवर जोरदार संघर्ष पाहायला मिळेल, हे पाहणीतून स्पष्ट झालेले आहे. दोन्ही आघाड्या येथे तुल्यबळ असल्याचे चित्र समोर येते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला असणारी जनतेची मान्यता, लातूर-नांदेड येथे काँग्रेसचे असणारे बळ यांमुळे मराठवाड्यातील सामना रंगतदार होणार आहे. पंकजा मुंडे यांची भूमिका काय असणार, मराठा समाज कोणाच्या पाठीशी उभा राहणार, मागासवर्गीय मतदार कोणत्या आघाडीकडे झुकणार, मुस्लिम समाजाची भूमिका काय असेल, यावर मराठवाड्यातील चित्र अवलंबून राहणार आहे. आजच्या पाहणीनुसार येथील टक्कर काट्याची असेल.

पश्चिम महाराष्ट्र १२

  • NDA ०६-०५

  • INDIA ०६-०७

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसच्या विचारांना मानणारा आहे आणि त्याची नैसर्गिक बांधिलकी याच विचारांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे, हे यापूर्वी अनेकदा दिसलेले आहे. मोदी लाटेतही पश्चिम महाराष्ट्रातील शिरूर, बारामती, सातारा या जागा टिकविण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले होते. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे या विभागातील काँग्रेसच्या विचाराचे वर्चस्व पूर्ण मोडीत निघेल का, या प्रश्नाचे उत्तर या पाहणीतून नकारार्थी आहे. INDIA ला या भागातील जागा टिकविण्यासाठी शर्थ करावी लागेल आणि काही जागा गमवाव्याच लागतील, असेच पाहणीतून दिसते आहे.

विदर्भ १०

  • NDA ०९-०८

  • INDIA ०१-०२

विदर्भात कॉंग्रेसचा जनाधार असला, तरी गेल्या दोन निवडणुकांत काँग्रेसची डाळ शिजलेली नाही. भाजपची विधानसभेतील कामगिरी घसरूनही लोकसभेवर त्याचा परिणाम होताना दिसत नाही. अकोल्यासारखी जागा हिसकावून घेण्यासाठी INDIA ला प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सामावून घ्यावे लागेल. त्याचा लाभ अन्य दोन-तीन मतदारसंघांतही होईल.

खान्देश ०६

  • NDA ०९-०८

  • INDIA 0१-०२

खान्देशात शिवसेनेच्या ठाकरे गटाला चांगली पसंती असल्याचे चित्र पाहणीत दिसलेले आहे. परंतु एकसंध राष्ट्रवादी नसल्याने विजयाचे गणित अद्यापही दूरच दिसते आहे.

उमेदवारांची दमछाक करणाऱ्या बारा लढती

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत काँग्रेस-राष्ट्रवादीला दारूण पराभवास सामोरे जावे लागलेले होते. नरेंद्र मोदी यांच्या लाटेमुळे भाजप-शिवसेनेच्या अनेक उमेदवारांची नौका आरामात पार लागली होती. येत्या लोकसभा निवडणुकीत हे चित्र असणार नाही. जवळपास एक तृतीयांश लोकसभा मतदारसंघांत कमालीच्या चुरशीच्या लढती होणार, हे स्पष्ट दिसते आहे.खान्देशातील धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडे तगडा उमेदवार आहे. त्याचे मोठे आव्हान विद्यमान भाजप खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्यासमोर असेल. विदर्भातील बुलढाणा आणि चंद्रपूर येथेही रंगतदार लढती होतील. बुलढाण्यातून रविकांत तुपकर यांची उमेदवारी कोणाकडून येते, यावर येथील लढतीत रंग भरणार आहे; तर चंद्रपुरात बाळू धानोरकर यांचे निधन झाल्यामुळे काँग्रेसला ती जागा टिकविण्यासाठी सहानुभूतीचे रूपांतर मतांत करून घ्यावे लागेल.

मराठवाड्यातील हिंगोली, लातूर, धाराशिव आणि छ. संभाजीनगरमध्ये घमासान लढती होतील. छ. संभाजीनगरमध्ये गेल्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलिल विजयी झाले होते. या वेळी त्यांच्या पाठीशी मुस्लिम समाज एकसंध उभा राहणार का, INDIA त्यांनाच पाठिंबा देणार का, यावर तेथील लढतीची तीव्रता ठरणार आहे. लातूरमध्ये काँग्रेसचा जनाधार अद्यापही टिकून आहे आणि अमित देशमुख, धीरज देशमुख यांची ताकद लागली, तर ही जागा टिकविताना भाजपची दमछाक होईल. काहीसे असेच चित्र हिंगोली व उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघांतही दिसते आहे. महामुंबईच्या पट्ट्यांतील पालघर आणि भिवंडी या दोन लोकसभा मतदारसंघांत भाजपला कडच्या झुंजीस तोंड द्यावे लागेल, असे दिसते आहे.

या दोन्ही लढती जेवढ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत, तेवढ्याच त्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही प्रतिष्ठेच्या आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, माढा आणि सातारा येथे सामना चुरशीचा होईल. अहमदनगर येथे भाजपला अधिक संधी असली, तरीही गेल्या निवडणुकीसारखी सुलभता नाही, असे पाहणीतून दिसून येते. हेच माढ्यातही घडताना दिसते आहे. येथील विद्यमान उमेदवारांना सर्व शक्तीनिशी उतरावे लागणार आहे. सातारा हा शरद पवार यांच्यावर व्यक्तिगत प्रेम करणार जिल्हा आहे. येथील मतदारांनी उदयनराजे भोसलेंसारख्या ताकदीच्या उमेदवाराला शरद पवार यांच्या आवाहनानुसार पराभूत केले. येथे श्रीनिवास पाटील पुन्हा मैदानात येणार का की शशिकांत शिंदे उतरणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

असा झाला सर्व्हे

राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांतून ६०,०००+ सॅम्पल

पर्पजिव्ह सॅम्पलिंग पद्धतीने सर्व जाती, लिंग, वयोगट, व्यवसाय यांचे प्रतिनिधित्व

पुढारी'च्या पत्रकारांमार्फत नागरिकांना प्रत्यक्ष भेटून अॅपद्वारे मतांची नोंदणी

(सव्हेचा कालावधी १ से २८ ऑगस्ट २०२३)

संभाव्य नवे चेहरे

ही पाहणी करताना ज्या उमेदवारांच्या नावांची चर्चा गंभीरपणे संबंधित मतदारसंघात सुरू आहे, याचीही माहिती समोर आली. विविध राजकीय पक्षांकडून पुढे येऊ शकणारी संभाव्य नावे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news