मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बनविलेल्या 'इंडिया' आघाडीकडून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आघाडीचे संयोजक बनविण्यात यावे, असा आग्रह काँग्रेसने धरला आहे. यावर 'इंडिया'च्या बैठकीत शिक्कामोर्तब होईल.
मुंबईतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ही बैठक होत आहे. 'इंडिया'च्या घटकपक्षांच्या नेत्यांनी गुरुवारी रात्री 'डिनर डिप्लोमसी' केली. यावेळी झालेल्या प्राथमिक चर्चेत काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांना 'इंडिया' आघाडीचे संयोजक करावे, असे सुचविण्यात आले. काँग्रेस हा आजही देशातील प्रमुख पक्ष आहे. 'इंडिया' आघाडीचे नेतृत्व हे काँग्रेसकडे असले पाहिजे, अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मोदी यांचा पराभव करायचा असेल, तर काँग्रेस हा मोदी यांच्याविरोधात प्रमुख चेहरा असला पाहिजे, तर मतदार 'इंडिया' आघाडीला गांभीर्याने घेतील, अशी काँग्रेसची भूमिका आहे.
पंतप्रधानपदाचा चेहरा मागास समाजाचा हवा
2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने आरक्षण असलेल्या जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे मोदी यांच्याविरोधात मागास समाजाचा नेता हा 'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार असला पाहिजे, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. यासाठी काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव पुढे केले आहे. परंतु, खर्गे यांचे नाव पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले, तर ही आघाडी तुटेल, अशी भीती काँग्रेससह मित्रपक्षांना वाटत आहे. त्यामुळे खर्गे यांना संयोजक करण्यावर आघाडीत सहमती होत आहे.
दुसरीकडे, सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे नितीशकुमार यांना संयोजकपदात रस होता; पण त्यांनी आता संयोजक बनण्यास नकार दिला असल्याचे कळते. 'इंडिया' आघाडीची मुंबईत होत असलेली बैठक निर्णायक समजली जाते. पाटण्यात झालेल्या पहिल्या बैठकीत भाजपविरोधात एकत्र येऊ शकतो का, याची चाचपणी विरोधकांनी केली. त्यानंतर बंगळुरात झालेल्या दुसर्या बैठकीत आघाडीचे नाव 'इंडिया' असे ठरले आणि भाजपविरोधात एकजुटीचे पहिले पाऊल खर्या अर्थाने पडले. आता मुंबईतील बैठकीचा पहिला दिवस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आयोजित स्नेहभोजनाने मावळला.