शिवस्मारक, मराठा आरक्षणाचे काय झाले? : संभाजीराजे | पुढारी

शिवस्मारक, मराठा आरक्षणाचे काय झाले? : संभाजीराजे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : भाजपने मराठा समाजाला मराठा आरक्षण, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर भाजप गप्प आहे, तर शिवस्मारकाचे जलपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून नऊ वर्षे झाली तरी अजून हे स्मारक का होत नाही, असा सवाल माजी खासदार संभाजीराजे यांनी केला.

स्वराज्य पक्षाचा प्रथम वर्धापन दिन यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये झाला. यावेळी ते बोलत होते. संभाजीराजे यांनी आपल्या भाषणात प्रामुख्याने भाजपला लक्ष्य केले.

ते म्हणाले, भाजपने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले. मात्र सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण रद्द झाल्यानंतर केंद्र आणि राज्यात सत्ता असलेला भाजप पुढे काय भूमिका घेणार हे सांगायला तयार नाही. धनगर आरक्षणाची तीच अवस्था आहे. भाजपसोबत गेलेले धनगर समाजाचे काही नेतेही आता काही बोलत नाहीत. धनगर आरक्षणाचा मुद्दा आता बासनात टाकला आहे, अशी टीका संभाजीराजे यांनी केली.

दोन्ही पवार गट पुन्हा एकत्र येतील

राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट महायुतीत सामील झाल्याने संभाजीराजे यांनी भाजपला लक्ष्य केले. ज्यांना तुरुंगात टाकण्याची भाषा करत होते, त्यांनाच आता सोबत घेतले आहे. पण, हे तीन पक्ष भविष्यात एकत्र राहणार नाहीत. हे पक्ष लोकसभेपुरते एकत्र आले आहेत. कदाचित लोकसभा निवडणूक संपल्यानंतर अजित पवार गट पुन्हा शरद पवार गटात सामील होईल, असे भाकीतही संभाजीराजे यांनी केले. या नीतिभ्रष्ट राजकीय परिस्थितीविरोधात स्वराज्य पक्ष लढा देईल, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button