मेट्रो मार्गिकांसाठी टीम लीडर्सची नियुक्ती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुक्तांचा निर्णय | पुढारी

मेट्रो मार्गिकांसाठी टीम लीडर्सची नियुक्ती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आयुक्तांचा निर्णय

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील मेट्रो प्रकल्पांचे काम जलदगतीने पूर्ण करून शहरात सक्षम अशी वाहतूक व्यवस्था नियोजित वेळेत विकसित व्हावी यासाठी महानगर आयुक्तांनी आता प्रत्येक मेट्रो मार्गिकेसाठी आणि मेट्रो भवनासाठी टीम लीडर्सची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकल्पांचे पर्यवेक्षण टीम लीडर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्माणाधिन असलेल्या ७ मेट्रो प्रकल्पांचे काम जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

टीम लीडर्सची भूमिका ठरणार धोरणात्मक

मुंबई महानगर प्रदेश हे लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर असलेले सर्वात मोठे महानगर असून, सध्या ७ मेट्रो मार्गिका निर्माणाधीन आहेत. ते वेळेत पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक योजनेची आवश्यकता आहे. नियुक्त केलेले टीम लीडर त्यासंदर्भातील योजना आखून महानगर आयुक्तांच्या सल्ल्यानुसार गुणवत्तेचे सर्वोच्च मापदंड राखून सर्व मेट्रो मार्गाचे काम जलद पूर्ण होईल याची खात्री करतील.
टीम लीडर हा संचालक, मुख्य अभियंता किंवा अतिरिक्त मुख्य अभियंता या पदांवरील अधिकारी असेल. त्यांच्या नेतृत्वाखली असलेली टीम ही त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहील. टीम लीडर प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात उद्भवणाऱ्या सर्व समस्या कमी करून प्रकल्प प्रगतीसाठी कार्यरत राहतील. प्रकल्प व्यवस्थापन क्रियाकलापांच्या सर्वसमावेशक पर्यवेक्षणासाठी टीम लीडर जबाबदार असतील. त्यासोबत प्रकल्पाच्या भौतिक आणि आर्थिक प्रगती या दोन्हीच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, तसेच स्थानके, व्हायाडक्ट्स, डेपो, पूल आणि प्रमुख अभियांत्रिकी इमारतींचे नियमित ऑन-साइट मूल्यांकन आयोजित करणे, मेट्रो मार्गीकेच्या परिसरात आणि मल्टी-मॉडल इंटिग्रेशन डेव्हलपमेंटच्या इ. कर्तव्यांचा समावेश आहे. हा उपक्रम मुंबई मेट्रो मार्गांच्या बांधकामाला गती देण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य विलंबाची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

मुंबईची आर्थिक आणि सामाजिक प्रगती ही उभारल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. नेमण्यात आलेले सर्व टीम लीडर हे सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतील. मेट्रो प्रकल्पांमुळे नागरिकांच्या वाहतुकीच्या वेळेत बचत होणार असल्याने नागरिकांना कुटुंबासोबत घालवायला अधिक वेळ मिळणार आहे, असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. मुखर्जी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button