अजित पवार यांचे बंड ही शरद पवार यांची खेळी : राज ठाकरे  | पुढारी

अजित पवार यांचे बंड ही शरद पवार यांची खेळी : राज ठाकरे 

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बंड म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीच खेळी आहे. राष्ट्रवादीची एक टीम सत्तेत गेली आहे. दुसरीही लवकरच जाईल, असा खळबळजनक आरोप मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोमवारी पदाधिकार्‍यांच्या बैठकीत केला. भाजपची आपल्यालाही ऑफर आहे, मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा गट महायुतीत सामील झाल्यामुळे आपण कोणताच निर्णय घेतलेला नाही, असे त्यांनी सोमवारी सांगितले.

शरद पवार आणि अजित पवार यांची वारंवार होणारी भेट हा काही घरगुती मामला नाही. शरद पवार यांच्या परवानगीनेच अजित पवार सत्तेत सहभागी झाले आहेत. हे सर्व अचानक घडलेले नाही. 2014 पासून राष्ट्रवादी काँग्रेस भाजपच्या संपर्कात आहे, असा आरोप त्यांनी केला.

पवार-मोदी यांचे मैत्रीपूर्ण संबंध

शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मैत्रीचे संबंध आहेत. त्यामागे खास कारणही आहे. दोघे एकमेकांवर टीका करीत असले तरी त्यांची देहबोली मात्र वेगळेच काही सांगून जाते. त्यामुळेच राष्ट्रवादीची दुसरी टीम लवकरच सत्तेत जाईल, याची मला पूर्णपणे खात्री आहे, असे राज ठाकरे म्हणाले. मी सध्या तरी कोणत्या आघाडीला बघत नाही. परिस्थितीनुसार गोष्टी ठरत असतात. मात्र महाराष्ट्राशी प्रतारणा होणार नाही याची काळजी मात्र निश्चित घेऊ, असे राज यांनी सांगितले.

Back to top button