इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पटोले – उद्धव ठाकरे यांची भेट | पुढारी

इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी पटोले - उद्धव ठाकरे यांची भेट

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : मुंबईत 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार्‍या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’मध्ये भेट घेतली.

अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाली. पटोले म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पुण्यात झालेल्या बैठकीवरून राज्यातील जनता आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तथापि अशा प्रकारच्या राजकीय भेटीगाठी होतच असतात. त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नसते. या दोन नेत्यांच्या गाठीभेटी झाल्या असल्या तरी महाविकास आघाडी एकत्र आहे. त्यामुळे लोकांमध्ये कोणताही संभ्रम होऊ नये, अशी आमची धारणा आहे. मात्र, या विषयावर लवकर भूमिका स्पष्ट झाली पाहिजे.

ठाण्याच्या रुग्णालयात 10 तासात 18 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. यावरून राज्याची आरोग्यव्यवस्था कोलमडली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणात राज्य शासन दोषी आहे, अशी जनतेची भावना आहे. सरकारी अधिकार्‍यांच्या बदल्या करून हे सरकार प्रशासन अस्थिर ठेवत आहे, असेही ते म्हणाले.

Back to top button