मुख्यमंत्र्यांची गैरहजेरी; नाराजीची पुन्हा चर्चा

एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे

मुंबई; दिलीप सपाटे : चांदणी चौकातील पुलाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहिल्याने राज्याच्या सत्तेत ते नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यातील महत्त्वाच्या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असताना मुख्यमंत्री दुसऱ्यांदा गैरहजर राहिल्याने या चर्चेत आणखी भर पडली आहे. मुख्यमंत्र्यांच्या गोटातून मुख्यमंत्री आजारी असल्याने या कार्यक्रमाला आले नाहीत, असे सांगितले जात असले तरी मुख्यमंत्री साताऱ्यात सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग झाल्याने संभ्रम वाढला आहे.

अजित पवार आणि राष्ट्रवादीचा एक गट राज्य सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच शिंदे गटात नाराजी असल्याची बाब लपून राहिलेली नाही. याबाबतची वक्तव्ये शिंदे गटाच्या आमदारांनी उघडपणे केली होती. तसेच अजित पवार यांना मुख्यमंत्रिपदाचे आश्वासन दिल्याशिवाय ते सत्तेत सहभागी झाले नसते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे तर शिंदे गटाची अस्वस्थता जास्तच वाढली आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना मनोरा आमदार निवासाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला प्रकृती अस्वास्थ्यामुळे आले नाहीत असे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते. मात्र सकाळी १० च्या कार्यक्रमाला गैरहजर राहणारे मुख्यमंत्री दपारी १२ वाजता विधिमंडळाच्या कामकाजात हजर होते, ही बाब लपून राहिली नव्हती.

वॉर रूमवरूनही वॉर

राज्यातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वॉर रूम तयार केली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मॉनिटरिंग कक्षही कार्यान्वित केला आहे. हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारावर अतिक्रमण असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आजारपणाचे कारण

शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यात चांदणी चौकातील नवीन पुलाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही उपमुख्यमंत्री हजर असताना मुख्यमंत्री गैरहजर होते. मुख्यमंत्री आजारी असल्याचे सांगितले जात असले तरी ते वन विभागाच्या बांबू लागवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांनी नाराजीमुळे कार्यक्रम टाळला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांची तब्येत प्रचंड खराब : शिरसाट

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे २४ तास काम करतात हे महाराष्ट्र जाणतो. आम्ही सर्व आमदारांनी त्यांना डॉक्टरांकडे जाण्याची विनंती केली आहे. १५ ऑगस्टनंतर त्यांना बळजबरीने हॉस्पिटलमध्ये पाठवणार आहोत. त्यांची तब्येत एवढी खराब आहे, त्याची कल्पना तुम्हाला नसेल. आम्ही जवळ राहतो. आम्हाला माहिती आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news