

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या खात्याचा कोणताही संबंध नसताना राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. त्यामुळे राज्यात वॉर रूममध्ये कोल्ड वॉर सुरू आहे, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वॉर रूमचे अध्यक्ष आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सहअध्यक्ष आहेत. मात्र, अजित पवार यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला होता. तसेच राज्यात वॉर रूम सक्रिय असताना स्वतः मॉनिटरिंग कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अजित पवार यांनी एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकार क्षेत्रात हस्तक्षेप केल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही टीकास्त्र सोडले.
ते म्हणाले, खात्याचा संबंध नसताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वॉर रूममध्ये राज्यातील प्रोजेक्टचा आढावा घेतला. त्यामध्ये मुख्यमंत्री अध्यक्ष असतात. त्याचा अर्थ खात्याशी काहीही संबंध नसतो. त्यामुळे वॉर रूममध्ये एकप्रकारे कोल्ड वॉर सुरू झाले आहे. हे कोल्ड वॉर कुठल्या दिशेने जाईल हे सांगता येत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाने मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांच्यात कोणतेही कोल्ड वॉर सुरू नसल्याचे सांगितले. विजय वडेट्टीवार सध्या राज्याचे नवीन विरोधी पक्षनेते बनलेले आहेत. त्यामुळे आपले वजन बनवण्याकरिता त्यांना टीका करावीच लागते. पूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना फोनदेखील करत नव्हते. परंतु, आताच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममध्ये उपमुख्यमंत्री बैठका घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवताना पाहायला मिळत आहेत, असे शिवसेना प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.