Dr. Babasaheb Ambedkar : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांच्या 350 फूट पुतळा निर्मितीवर मोहोर | पुढारी

Dr. Babasaheb Ambedkar : इंदू मिलमध्ये डॉ. आंबेडकरांच्या 350 फूट पुतळा निर्मितीवर मोहोर

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : Dr. Babasaheb Ambedkar : मुंबईतील इंदू मिल परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकात उभारण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट पुतळ्याच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. आंबेडकर कुटुंबीय, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष पाहणी करून मान्यता दिलेल्या प्रतिकृतीच्या आधारे आता 350 फुटी पुतळा उभारण्यात
येणार आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने गुरुवारी इंदू मिल येथील स्मारकातील 350 फूट पुतळ्यास मान्यता देणारा शासन निर्णय (जीआर) जारी केला. सुप्रसिद्ध शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा साकारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची 25 फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच स्मारकातील मुख्य पुतळा उभारण्यात येणार आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेल्या पुतळ्याबाबत नाराजीचे सूर उमटले होते. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 16 नोव्हेंबर 2022 च्या बैठकीत गाझियाबाद येथील प्रतिकृतीच्या प्रत्यक्ष पाहणीचा निर्णय झाला. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या कुटुंबातील आनंदराज आणि भीमराज आंबेडकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने 6 एप्रिल 2023 रोजी गाझियाबाद येथील राम सुतार आर्ट कंपनीला भेट दिली. तिथे मुख्य पुतळ्याच्या 25 फुटी प्रतिकृतीची पाहणी करून त्यावर पसंतीची मोहोर उमटविली होती. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येणार आहे.

शिष्टमंडळाने सहमतीस अनुसरून इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकात उभारण्यात येणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 350 फूट पुतळ्यासाठी राम सुतार यांच्या शिल्पशाळेतील 25 फुटी प्रतिकृतीच्या पुतळ्याच्या धर्तीवर 350 फुटी पुतळा तयार करण्यास मान्यता देणारा जीआर सामाजिक न्याय विभागाने गुरुवारी जारी केला आहे.

हे ही वाचा :

Back to top button