आयसीआयसीआय बँकेला कोचर यांच्यामुळे 1033 कोटींचा फटका | पुढारी

आयसीआयसीआय बँकेला कोचर यांच्यामुळे 1033 कोटींचा फटका

मुंबई; वृत्तसंस्था :  आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यामुळे या बँकेला तब्बल 1033 कोटींचा फटका बसल्याची माहिती सीबीआयच्या आरोपपत्रातून समोर आली आहे. तब्बल दहा हजार पानांच्या या आरोपपत्रात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

जून 2009 ते ऑक्टोबर 2011 या कालावधीत चंदा कोचर यांनी वेणुगोपाल धूत यांच्या नेतृत्वाखालील व्हिडीओकॉन समूहाला एकूण 1875 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. यातील सनसनाटी बाब म्हणजे नंतर व्हिडीओकॉन समूहाने यातील 64 कोटी रुपये चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या न्यूपॉवर रिन्यूएबल लि. या कंपनीकडे वर्ग केले. चंदा कोचर यांनी 64 कोटी रुपयांची लाच घेतली आणि आपल्या पदाचा दुरुपयोग केला, असेही म्हटले आहे.

पाच कोटींचे घर 11 लाखांत

आरोपपत्रानुसार मुंबईतील सीसीआय चेंबर्स येथे ज्या फ्लॅटमध्ये चंदा व दीपक कोचर राहात होते, त्याची किंमत 1996 मध्ये सुमारे साडेपाच कोटी होती. या फ्लॅटची मालकी व्हिडीओकॉन समूहाकडे असताना तिथे कोचर दाम्पत्य वास्तव्याला होते. 2016 मध्ये हा फ्लॅट अवघ्या 11 लाख रुपयांत कोचर यांच्या वैयक्तिक ट्रस्टच्या नावावर करण्यात आला.

धूत-कोचर यांच्यात धमकीसत्र

कोचर दाम्पत्याकडे ताबा असलेल्या फ्लॅटवरून नंतर धूत आणि दीपक कोचर यांच्यात मोठी वादावादी झाली. यादरम्यान, चंदा कोचर यांना तुरुंगात पाठवू आणि त्यांना इंद्राणी मुखर्जी यांच्यासोबत जेलमधील खोलीत राहावे लागेल, अशी धमकी धूत यांनी दीपक यांना दिली. यानंतर दीपक यांचा संताप अनावर झाला व त्यांनीही धूत यांना संपवून टाकू, अशी धमकी दिल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.

Back to top button