मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विविध मागण्यांसाठी बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांची होणारी गैरसोय होत होती. त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर परिक्षेत्रातील रिक्षा, टॅक्सी, खाजगी बसेस, स्कूल बसेस आदी सर्व प्रकारच्या वाहनांतून प्रवाशांच्या सोयीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भात शासनाने अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
बेस्ट कामगार ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ३ ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपामुळे सर्व सामान्य जनतेला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या सार्वजनिक सेवा वाहनांतून प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी शासनाने आपल्या अधिकाराचा वापर करून अधिसूचना जारी केली आहे. संप संपेपर्यंतच्या कालावधीसाठी टप्पा वाहतूक करण्यास परवानगी दिली आहे. संप मागे घेतल्यानंतर सदर अधिसूचना रद्द समजण्यात येणार आहे, असे गृह (परिवहन) विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद केले आहे.