कोल्हापूर जि.प.चे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे निलंबित; शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत घोषणा | पुढारी

कोल्हापूर जि.प.चे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे निलंबित; शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत घोषणा

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत कामाच्या तसेच टेंडरबाबत आलेल्या तक्रारींची दखल घेऊन कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत केली. धोंगे यांनी तक्रारीनंतर नेमलेल्या चौकशी समितीला सहकार्य केले नाही व कागदपत्रे दिली नसल्याचे देसाई म्हणाले. महादेव जानकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला ते उत्तर देत होते.

जलजीवन मिशन योजनेतील कामावरून झालेल्या तक्रारींची दखल घेऊन चौकशी समिती नेमण्यात आली. या समितीला चौकशी न करताच परत जावे लागले होते. त्यानंतर जिल्हा परिषदेने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली दुसरी समिती स्थापन केली. त्यांनी अहवाल दिला. त्यानंतर जि. प. तसेच जलजीवन मिशनमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या. त्यानंतर धोंगे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले. या निर्णयाच्या विरोधात धोंगे उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर ते पुन्हा हजर झाले. त्याला 24 तास होण्यापूर्वीच शुक्रवारी विधान परिषदेत यावर लक्षवेधी मांडण्यात आली. लक्षवेधी मांडताना महादेव जानकर यांनी या कामांत भ—ष्टाचाराच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली.

Back to top button