मुंबई : चेंबूरच्या आचार्य-मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास बंदी! | पुढारी

मुंबई : चेंबूरच्या आचार्य-मराठे महाविद्यालयात विद्यार्थिनींना बुरखा घालण्यास बंदी!

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : चेंबूरमधील ना. ग. आचार्य व दा. कृ. मराठे महाविद्यालयातील ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना कॉलेजचा गणवेश दिला असून त्यांना तोच गणवेश परिधान केल्यानंतरच प्रवेश दिला जात आहे. मात्र, मंगळवारी काही मुस्लिम समाजाच्या विद्यार्थिनींनी बुरखा घालून कॉलेज मध्ये प्रवेश केल्याने त्यांना सुरक्षा रक्षकांनी रोखले. त्यामुळे बुरखाधारी विद्यार्थिनींनी कॉलेज बाहेर आंदोलन केले. यामुळे या ठिकाणचे वातावरण काही काळ तणावाचे झाले होते.

आचार्य-मराठे महाविद्यालयात या वर्षीपासून ११ वी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. या संदर्भात कॉलेजच्या व्यवस्थापनाने यापूर्वीच पालकांची बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्यानुसार मागील एक ते दीड महिन्यापासून ११ वी १२ वीचे विद्यार्थी गणवेश परिधान करून येत आहेत. मात्र मंगळवारी मुस्लिम समाजाच्या १५ ते १६ विद्यार्थिनी बुरखा घालून कॉलेज मध्ये प्रवेश करू लागल्याने सुरक्षा रक्षकांनी त्यांना प्रवेशव्दारावरच अडविले.

कॉलेजचा गणवेश परिधान केल्याशिवाय प्रवेश देणार नसल्याचा पवित्रा सुरक्षा रक्षकांनी घेतल्याने त्या ठिकाणचे वातावरण तणावाचे झाले. अचानक संबंधित विद्यार्थिनींचे पालक त्या ठिकाणी आले व त्यांनी आपल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश देण्यासाठी आग्रह करू लागले. त्यानंतर या ठिकाणी गोंधळ सुरू झाला. घटनास्थळी गोवंडी पोलीस दाखल झाले. त्यांनी पालकांना समजावण्याचा प्रयत्न केला. बुरखा घालून आलेल्या मुलींना कॉलेजमध्ये प्रवेश द्यावा, त्यांना गणवेश परिधान करण्यासाठी एक स्वतंत्र वर्ग द्यावा अशी मागणी संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांनी कॉलेज व्यवस्थापनाकडे केली. कॉलेज व्यवस्थापनाने या संदर्भात १० दिवसांचा अवधी मागितला आहे.

कॉलेजने सहा जणांची कमिटी नियुक्त केली होती. त्यांनी कनिष्ठ महाविद्यालयातील मुलांसाठी निळ्या रंगाचे पॅन्ट व पिवळ्या रंगाचा हाफ शर्ट तर मुलींना सलवार कमीज त्यावर निळ्या रंगाचे जॅकेट असा गणवेश सुचवला होता. १ मे रोजी या संदर्भात बैठक घेण्यात आली त्या बैठकीत ५४८ पालक उपस्थित होते. सर्वांना या संदर्भात नियम सांगण्यात आले होते. १५ जून पासून कॉलेज सुरू झाले. परंतु, तोपर्यंत गणवेश सर्वांना शिवणे शक्य नव्हते म्हणून त्यांना वेळ दिला गेला व सातत्याने त्यांना गणवेश घालण्याच्या सूचना दिल्या गेल्या. १ ऑगस्ट पासून गणवेश सक्तीचा करण्यात आला. या कॉलेज जे नियम आहेत ते त्यांनी पाळणे गरजेचे आहे.
– विद्या लेले, प्राचार्य , आचार्य – मराठे महाविद्यालय

हेही वाचलंत का?

Back to top button